FIFA WC Netherlands Vs USA : नेदरलँडची उपांत्यपूर्व फेरीत धडक; अमेरिकेला ३ – १ फरकाने केले पराभूत | पुढारी

FIFA WC Netherlands Vs USA : नेदरलँडची उपांत्यपूर्व फेरीत धडक; अमेरिकेला ३ - १ फरकाने केले पराभूत

दोहा(कतार); पुढारी ऑनलाईन : फूटबॉल विश्वचषकातील राऊंड ऑफ १६ मधील पहिला सामना नेदरलँड विरुद्ध अमेरिका यांच्या खेळविण्यात आला. या बाद फेरीतील पहिल्या सामन्यात नेदरलँडने अमेरिकेला ३ – १ अशा फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अमेरिकेचा यंदाचा विश्वचषकातील प्रवास अखेर शनिवारी संपुष्टात आला. २००२ नंतर अमेरिकेला कधीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आलेला नाही. (FIFA WC Netherlands Vs USA)

नेदरलँडने अमेरिकेचा 3-1 असा पराभव करत फिफा वर्ल्डकप 2022 ची क्वार्टर फायनल गाठली. नेदरलँडने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत अमेरिकेवर दबाव वाढवला होता. मात्र, दुसर्‍या हाफमध्ये अमेरिकेने झुंजार खेळ करत 76 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात जान आणली; मात्र नेदरलँडच्या डमफायर्सने 81 व्या मिनिटाला तिसरा गोल करत अमेरिकेचा पराभव निश्चित केला. (FIFA WC Netherlands Vs USA)

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील पहिला सामना नेदरलँड आणि अमेरिका यांच्यात झाला. पहिल्या हाफपासूनच तुलनेने बलाढ्य असलेल्या नेदरलँडने सामन्यावर आपले नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या 10 व्या मिनिटालाच मेम्फिस डेपेने गोल करत नेदरलँडला आघाडी मिळवून दिली. यानंतर अमेरिकेने हा गोल फेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेदरलँडने पहिल्या हाफमध्ये सामन्याचे नियंत्रण आपल्याकडेच ठेवले.पहिल्या हाफच्या इंज्युरी टाईममध्ये पहिल्याच मिनिटाला नेदरलँडच्या डॅले ब्लिंडस्ने दुसरा गोल करत अमेरिकेला अजून एक धक्का दिला. ब्लिंडस् हा नेदरलँडकडून वर्ल्डकपमध्ये गोल करणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. (FIFA WC Netherlands Vs USA)

पहिल्या हाफमध्ये दोन गोल खाल्ल्यानंतर दुसर्‍या हाफमध्ये अमेरिकेने नेदरलँडच्या गोलपोस्टवरील आक्रमण वाढवण्यास सुरुवात केली. अमेरिकेला गोल करण्याच्या संधीदेखील मिळाल्या; मात्र त्यांचे फटके गोलपोस्टच्या वरून गेले; तर गोलरक्षक नोपर्टनेदेखील अमेरिकेचे काही प्रयत्न हाणून पाडले. अखेर 76 व्या मिनिटाला अमेरिकेने गोल करण्याची संधी दवडली नाही. पुलिसिकच्या साहाय्याने हाजी राईटने नेदरलँडवर पहिला गोल करत सामना 2-1 असा आणला. अमेरिकेने दुसर्‍या हाफमध्ये नेदरलँडचा गोलकिपर नोपर्टला चांगलेच बिझी ठेवले.

अमेरिका दुसरा गोल करत सामना बरोबरीत आणणार असे वाटत असतानाच नेदरलँडने अमेरिकेच्या गोलपोस्टवर डाव्या बाजूने हल्ला चढवला. 81 व्या मिनिटाला नेदरलँडच्या मिडफिल्डर डेनझेल डमफायर्सने गोल करत आघाडी 3-1 अशी नेली. या गोलसाठी ब्लिंडस्ने सहाय्य केले. या गोलनंतर अमेरिकेची सामन्यात पुनरागमन करण्याची आशा जवळपास मावळली. अखेर नेदरलँडने अमेरिकेचा 3-1 असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.


अधिक वाचा :

Back to top button