FIFA WC Women Referee : पुरुष फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत महिला रेफरींनी रचला इतिहास | पुढारी

FIFA WC Women Referee : पुरुष फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत महिला रेफरींनी रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनी आणि कोस्टारिका यांच्यात गुरुवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात फ्रेंच रेफ्री स्टेफनी फ्रापार्ट या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रेफरी म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला रेफरी ठरल्या आहेत. यांच्यासह FIFA ने ब्राझीलच्या नुएजा बाक आणि मेक्सिकोच्या कॅरेन डियाझ मेडिना या दोन महिलांची मुख्य रेफरी रेफ्री स्टेफनी फ्रापार्ट यांच्या सहाय्यक रेफरीपदी निवड केली. या शिवाय अमेरिकेच्या कॅथरीन नेस्बिट या महिलेने व्हिडिओ असिस्टंट रेफरी म्हणून काम पाहिले. त्यामुळे फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात चार महिलांनी रेफरीची धुरा सांभळली. त्यामुळे या सामन्यावर एकप्रकारे महिलांचे वर्चस्व होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (FIFA WC Women Referee)

अल बायत स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या जर्मनी आणि कोस्टारिका सामन्यात चारही महिलांना रेफरीम्हणून संधी देत एक नवा इतिहास घडवला. यासह यंदा विश्वचषकात रवांडाची सलीमा मुकानसांगा आणि जपानची योशिमी यामाशिता या महिलांचाही स्पर्धेच्या अधिकृत रेफरींच्या यादीत समावेश आहे. (FIFA WC Women Referee)

फ्रापार्ट यांनी यापूर्वी चतुर्थ अधिकारी म्हणून काम केले आहे. फ्रान्सच्या ३८ वर्षीय फ्रापार्टला युरोपियन फुटबॉल संघटना UEFA ने पुरुषांच्या सामन्यांमध्ये अधिकृत भूमिका घेण्यासाठी त्यांना पदोन्नती दिली. फ्रापार्ट यांनी विश्वचषक पात्रता आणि चॅम्पियन्स लीग तसेच या वर्षाच्या सुरुवातीला पुरुषांच्या सामन्यांमध्ये फ्रेंच कप फायनलमध्ये काम पाहिले आहे. FIFA साठी २०१९ च्या महिला विश्वचषक फायनल सामन्याचीही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

हेही वाचा;

Back to top button