

बार्सेलिया (ब्राझिल); पुढारी ऑनलाईन : कतारमध्ये फूटबॉल विश्वचषकाचे रणांगण तापले आहे. दिग्गज विश्वविजेता होण्यासाठी एकमेकांशी भिडत आहेत. शनिवार पासून बाद फेरीला प्रारंभ झाला आहे. अवघ्या जगाच्या नजरा कतारवर भिडल्या आहेत. फूटबॉल चाहत्यांचा एक प्रकारे कुंभमेळा भरला असताना आता या जगभरातल्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. (Pele Hospitalized)
कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकादरम्यान, ब्राझीलमधील फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. माजी दिग्गज फूटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. त्यांना साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांना सामान्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु केमोथेरपीचा त्यांच्या शरीराच्या अवयवांवर परिणाम होत नाही. या कारणास्तव, त्यांना पॅलिएटिव्ह केअरमध्ये हलवण्यात आले आहे, हा एकप्रकारचा अतिदक्षता विभाग असतो. (Pele Hospitalized)
अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पेले यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे. त्यांच्यावर केमोथेरपीचा कोणताही परिणाम होत नाही. पेले सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. पेले यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांची मुलगी केली नॅसिमेंटो यांनी या वृत्ताला फेटाळून लावले. पण, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या ब्राझीलच्या मीडियातून येत आहेत. (Pele Hospitalized)
पेले यांच्या गंभीर अवस्थेच्या बातम्या पाहून जगातील अनेक फूटबॉलपटूंनी ट्विट करायला सुरुवात केली आहे. फ्रान्सचा युवा स्टार किलियन एमबाप्पे म्हणाला, फूटबॉल किंगसाठी प्रार्थना करा. त्याच वेळी, माजी ब्राझिलियन स्टार रिवाल्डोने लिहिले की, किंगला ताकत मिळो. फुटबॉल विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही पेले यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या आहेत. कतार विश्वचषकाच्या आयोजकांनीही पेलेंसाठी प्रार्थना केली आणि दोहामधील एका इमारतीवर लेझर लाइटद्वारे त्यांचे चित्र दाखवले आणि लिहिले की, 'लवकर बरे व्हा'.
पेले यांनी शुक्रवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या तब्येतीची माहिती दिली होती. यासोबतच कतारने या इमारतीवर दाखवलेला फोटोही शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, "मित्रांनो, मी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात आहे. असे सकारात्मक संदेश मिळणे नेहमीच छान असते. यासाठी कतारचे आणि मला चांगले संदेश पाठवणाऱ्या सर्वांचे आभार!
सात महिन्यांपूर्वीही रुग्णालयात झाले होते दाखल
सात महिन्यांपूर्वीही पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नियमित तपासणी करून ते बाहेर आले. सप्टेंबर 2021 मध्ये 82 वर्षीय पेले यांचा कोलन (मोठ्या आतड्यातून) ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून ते नियमित रुग्णालयात तपासणीसाठी जातात. ईएसपीएन ब्राझीलच्या वृत्तानुसार पेले यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांच्याकडून केमोथेरपी उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ब्राझीलला तीन वेळा बनवले चॅम्पियन
पेले यांनी ब्राझीलला तीन वेळा विश्वविजेता बनवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 1958 च्या विश्वचषक फायनलमध्ये त्यांनी सुदान विरुद्ध दोन गोल केले होते. पेले यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले आहेत. त्यांनी ब्राझीलसाठी 91 सामन्यात 77 गोल केले आहेत.
अधिक वाचा :