BAN v IND ODI series | बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये मोहम्मद शमीच्या जागी उमरान मलिकला संधी | पुढारी

BAN v IND ODI series | बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये मोहम्मद शमीच्या जागी उमरान मलिकला संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (BAN v IND ODI series) टीम इंडियात मोहम्मद शमी याच्या जागी उमरान मलिक याची निवड करण्यात आली आहे. शमीला सराव सत्रादरम्यान खांद्याला दुखापत झाली आहे. यामुळे तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि ३ सामन्यांच्या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) म्हटले आहे.

बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक. (BAN v IND ODI series)

बांगलादेश विरुद्ध रविवारपासून (दि. ४डिसेंबर) सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी (ODI series) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला (India Tour of Bangladesh 2022) मोठा धक्का बसला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. शमी १४ डिसेंबरपासून चितगाॅंग येथे होणार्‍या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातून टी२० वर्ल्डकप खेळून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान मोहम्मद शमीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शमीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीवर परिणाम होणार आहे. कारण जसप्रीत बुमराह देखील संघातून बाहेर आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की, “ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकप नंतर शमीने सराव सुरू केला होता. यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (NCA) रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे आणि तो १ डिसेंबर रोजी टीम इंडिया सोबत बांगलादेशला गेला नाही. मोहम्मद शमीला झालेली दुखापत किती गंभीर आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. (India Tour of Bangladesh 2022)

जूनमध्ये ओव्हल येथे होणाऱ्या आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी भारताला प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. पण त्याआधी शमी कसोटी मालिकेतून बाहेर राहिल्यास कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे. शमीने कसोटी क्रिकेटमधील ६० सामन्यांत २१६ विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारत अ संघातून शमी कसोटीतून बाहेर राहिल्यास भारताकडे नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांची निवड करावी लागणार आहे. पहिल्या चार दिवसांच्या खेळात सैनीने चार विकेट घेतल्या, तर मुकेशने तीन बळी घेतले आहेत. मुकेश अनकॅप्ड खेळाडू आहे. तर सैनीने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण करून भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सप्टेंबरमध्ये झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून अद्याप बरा झालेला नाही. तो आधीच एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर आहे. बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर चितगाँगमध्ये भारत- बांगलादेश यांच्यात १४ ते १८ डिसेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना होईल तर २२ ते २६ डिसेंबरदम्यान ढाक्यामध्ये दुसरी कसोटी होणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button