INDvsBAN : भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकात बदल | पुढारी

INDvsBAN : भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकात बदल

ढाका : पुढारी ऑनलाईन : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारत बांगलादेशच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यावर भारतीय संघ तीन वन-डे सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका (INDvsBAN) खेळणार आहे. वन-डे मालिका ही 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका आधी बांगलादेशची राजधानी ढाका येथे होणार होती. मात्र, आता वन-डे मालिकेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वन-डे मालिकेदरम्यान राजधानी ढाक्यामध्ये विरोधी पक्षातर्फे आंदोलन केले जाणार आहे. यादरम्यान ढाक्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे वन-डे मालिका ढाक्यातून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत 2015 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशचा दौरा करणार आहे. यासाठी भारतीय संघ पुढच्या आठवड्यात बांगलादेशला रवाना होणार आहे. दौर्‍याची सुरुवात 4 डिसेंबरला तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेने (INDvsBAN) होईल. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार तीनही वन-डे सामने हे ढाका येथे खेळवण्यात येणार होते. मात्र, आता मालिकेतील तिसरा वन-डे सामना हा चितगाव येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या आंदोलनाचा फटका या सामन्याला बसणार नाही. या आंदोलनादरम्यान हजारो नागरिक ढाक्याच्या रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांच्या नेतृत्वातील सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यासाठी देशभरात गेल्या महिन्याभरापासून अनेक मोठी आंदोलने आयोजित करण्यात आली आहेत. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक प्रमुख जलाल युनूस यांनी बुधवारी सांगितले की, ‘चितगाव स्टेडियम हे भारत दौर्‍यावरील एक कसोटी आयोजित करणार होते. आम्हाला वाटते की या मैदानावर एक वन-डे सामनादेखील व्हावा.’

जलाल यांनी ढाक्यामध्ये आंदोलन होणार आहे. त्यामुळे तिसरी वन-डे हलवण्यात आली का याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, स्थानिक माध्यमांनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एक सूत्रानेच आंदोलनाचा फटका सामन्याला बसू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. चितगावमध्ये भारत – बांगलादेश यांच्यात 14 ते 18 डिसेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना होईल तर 22 ते 26 डिसेंबरदम्यान ढाक्यामध्ये दुसरी कसोटी होईल.

Back to top button