FIFA World Cup : वर्णभेदावरून ज्‍यांना 'तुच्‍छ' लेखले 'त्‍यांनीच' इंग्‍लंडची लाज राखली! | पुढारी

FIFA World Cup : वर्णभेदावरून ज्‍यांना 'तुच्‍छ' लेखले 'त्‍यांनीच' इंग्‍लंडची लाज राखली!

पुढारी ऑनलाईन डेस्क : fifa world cup : फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड संघाची पहिल्या फेरीतील कामगिरी चमकदार राहिली असून संघाच्या दोन विजयात कृष्णवर्णीय खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलला आहे. मार्कस रॅशफोर्ड, ज्यूड बेलिंगहॅम, बुकायो साका, रहीम स्टर्लिंग यांनी नेत्रदिपक खेळ करून कधीकाळी आपल्यावर वर्णभेदाची टीप्पणी करणा-या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

युरो कप 2020 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला इटलीविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर कृष्णवर्णीय असणा-या रॅशफोर्ड, सांचो आणि साका यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये तिघांनाही गोलजाळे भेदता आले नव्हते आणि त्यामुळे इंग्लिश संघाचा पराभव झाला होता. त्यानंतर इंग्लंडचे चाहते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून संघातील रॅशफोर्ड, सांचो आणि साका यांच्याविरोधात मोर्चा उघडला. अनेकांनी तर वर्णभेदाची टिप्पणी करून तिन्ही खेळाडूंचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.

पण हे खेळाडू आपल्यावरील टीकेने खचले नाहीत. त्यांनी पुन्हा नव्या जोमाने आपल्या कर्मभूमीच्या विजयासाठी जीवाचे रान करण्याचा चंग बांधला. सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप सामन्यात हेच कृष्णवर्णीय खेळाडू इंग्लिश संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरत आहेत. हॅरी केनच्या नेतृत्वाखाली खेळणा-या इंग्लंडने बाद फेरी गाठली. संघाने दोन विजय आणि एक बरोबरी साधून 7 गुण मिळवले आणि राऊंड ऑफ 16 फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यांनी पहिल्या सामन्यात इराणचा 6-2 आणि तिस-या सामन्यात वेल्सचा 3-0 गोलफरकाने पराभव केला. अशाप्रकारे इंग्लिश संघाने पहिल्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी संघांवर 9 गोल केले असून त्यातील 7 गोल हे चार कृष्णवर्णीय खेळाडूंनीच डागले आहेत.

गोल करणारे इंग्लंड संघातील कृष्णवर्णीय खेळाडू (FIFA World Cup)

मार्कस रॅशफोर्ड – 3 गोल (इराणविरुद्ध 1, वेल्सविरुद्ध 2)
बुकायो साका – 2 गोल (इराणविरुद्ध)
ज्यूड बेलिंगहॅम – 1 गोल (इराणविरुद्ध)
रहीम स्टर्लिंग – 1 गोल (इराणविरुद्ध)

Back to top button