पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत विविध मुद्द्यांवरून सामन्यागणिक नवनवे वाद उफाळत आहेत. सोमवारी रात्री उशीरा खेळल्या गेलेल्या पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे सामन्यादरम्यान असेच काहीसे घडले. हा सामना सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून एक चाहता अचानक मैदानात घुसला आणि त्याने भर मैदानात एलजीबीटीक्यू समुदायाचा 'रेनबो' झेंडा फडकवून थेट कतारच्या कायद्याला आव्हान दिले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
अचानक घडलेल्या त्या प्रकारानंतर खळबळ उडाली आणि सामना काहीवेळ थांबला. मैदानातील सुरक्षा रक्षकही गडबडले. त्यांनी तत्काळ कारवाई करत सामन्यात अडथळा निर्माण करणा-या चाहत्याच्या मागे-मागे धावले. या पकडा-पकडीच्या खेळादरम्यान सुपरमॅन चाहत्याने त्याच्या हातातील रेनबो ध्वज मैदानातच टाकला आणि धुम ठोकली. अखेर सुरक्षा रक्षकांना घुसखोर चाहत्याला पकडण्यात यश आले.
नंतर पंचांनी मैदानात पडलेला रेनबो ध्वज उचलला आणि मैदानाबाहेर ठेवला. स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात सात युरोपियन संघांना समलैंगिक समुदायाचे प्रतिक असणारा 'वन लव्ह' आर्मबँड हातावर बांधण्याची परवानगी मागितली होती, पण फिफाने त्यावर आक्षेप घेतला आणि ती मागणी फेटाळून लावली. त्यानंतर या मुद्यावरून वाद वाढतच चालला आहे. कधी खेळाडू तर कधी प्रेक्षक समलैंगिकतेच्या मुद्दा पुढे करून फुटबॉलचे मैदान विरोधाचे व्यासपीठ बनवताना दिसत आहेत.
पोर्तुगाल-उरुग्वे सामन्यात एलजीबीटीक्यू समुदायाचा झेंडा घेऊन मैदानात घुसखोरी करणा-या चाहत्याने खास टी-शर्ट परिधान केला होता. त्याच्या टी-शर्टवर सुपरमॅनचा लोगो आणि 'सेव्ह युक्रेन' हे शब्द प्रिंट केले होते. या प्रकारावर फारसा गदारोळ झाला नसला तरी कतारमध्ये समलैंगिकतेच्या कायद्याला आणि रशियाने युक्रेन विरुद्ध पुकारलेल्या युद्धाला सातत्याने विरोध होत असल्याचे समोर आले आहे. या चाहत्याच्या धाडसी कृत्यावरून सर्वजण अवाक झाले आहेत. कतारमधील कायद्याला आव्हान देत तेथील सुरक्षा व्यवस्थेशी पंगा घेतल्याने त्याचे सोशल मिडियातून कौतुक होत आहे.
कतारमध्ये कायद्यानुसार समलैंगिकता हा गुन्हा आहे. कोणत्याही समलैंगिक ॲक्टीव्हिटीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा होऊ शकते. त्याच वेळी, बहुतांश पाश्चात्य देशांमध्ये समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली आहे.या शिक्षेत सात वर्षांचा तुरुंगवास ते दगडाने ठेचून मृत्यूदंड देण्याच्या शिक्षेचाही समावेश आहे. कतारमध्ये विवाहबाह्य शारीरिक संबंधांनाही कठोर शिक्षा दिली जाते.
या सामन्यात पोर्तुगालने उरुग्वेचा २-० असा पराभव करत २०१८ सालच्या पराभवाचा बदला घेतला. पोर्तुगालचे दोन्ही गोल ब्रुनो फर्नांडिसने केले. त्याने सामन्याच्या ५४व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि दुसऱ्या हाफच्या दुखापती वेळेत दुसरा गोल केला. मात्र, त्याची हॅटट्रिक पूर्ण करण्यात तो हुकला. त्याचा एक प्रयत्न फसला. चेंडू गोलपोस्टला लागला आणि बाहेर गेला.