पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषकात अर्जेनटिनाचा स्टार मेस्सीने (Lionel Messi) मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात शानदार गोल करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मेस्सीच्या गोलनंतर एकच जल्लोष झाला आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मात्र या गोलनंतर मेक्सिकोचा एक बॉक्सर चांगलाच संतापला असून त्याने थेट मेस्सीला धमकी दिली आहे.
वास्तविक, सामना जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये वाजत-गाजत सेलिब्रेशन केले. त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात मेस्सीही नाचत असल्याचे दिसत आहे. पण यावेळी त्याच्या समोर मेक्सिकोची जर्सी जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. सेलिब्रेशननंतर मेस्सी खाली बसतो तेव्हा त्याचा पाय मेक्सिकोच्या जर्सीत अडकतो, पण तो आपला पाय बाहेर काढून ती जर्सी बाजूला ठेवताना दिसत आहे.
मेस्सीचे हे कृत्य पाहून मेक्सिकन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझ संतप्त झाला आहे. त्याने ट्विटरवरून, 'मेस्सी मेक्सिकोची जर्सी घालून फरशी साफ करत आहे. हा मेक्सिकन लोकांचा अपमान आहे. त्यामुळे आता मेस्सी माझ्यासमोर कधीच येऊ नये म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना करावी. मी अर्जेंटिनाचा जसा आदर करतो, तसंच मेस्सीनेही मेक्सिकोचा आदर केला पाहिजे.' बॉक्सर अल्वारेझचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. (Lionel Messi)
या प्रकरणी मेस्सीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खरं तर, मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यानंतर मेस्सीने मेक्सिकन खेळाडूसोबत आपली जर्सी एक्सचेंज केली. खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये तीच जर्सी जमीनीवर पडली होती. त्यावर मेस्सीचा पाय चुकून पडला असावा असे मानले जात आहे. अर्जेंटिनाचा माजी फॉरवर्ड सर्जियो अग्युरो मेस्सीच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. मेस्सीकडून कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. केवळ नकळत झालेली ती चूक आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.