फिफा वर्ल्डकप : ‘ई’ गटातील चुरस वाढली… | पुढारी

फिफा वर्ल्डकप : ‘ई’ गटातील चुरस वाढली...

         विश्वचषक विश्लेषण

  • प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

ग्रुप ‘ई’मध्ये फुटबॉलमधील जर्मनी आणि स्पेन या दोन हेवीवेट संघांदरम्यान झालेला चुरशीचा सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. स्पेनने पहिल्या सामन्यात कोस्टारिकावर दणदणीत विजय मिळवला होता, पण जर्मनीला पहिल्या सामन्यात जपानकडून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे या सामन्यात ते जोरदार पुनरागमन करतील अशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणेच जर्मनीने जोरदार खेळ केला. 36 वर्षीय गोलकिपर मॅन्युअल नोयार याच्या नेतृत्वाखाली जर्मनीचा युवा संघ या स्पर्धेत खेळत आहे. 2024 ची युरो स्पर्धा जर्मनीमध्ये होणार आहे. त्या युरो स्पर्धेची आणि 2026 मधील विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून जर्मनीने युवा संघ या स्पर्धेत उतरवला आहे. स्पेन आणि जर्मनी हे दोन फुटबॉल जगतातील हेवीवेट संघ म्हणून ओळखले जातात, पण सध्या हे दोन्ही संघ संक्रमणातून जात आहेत. दोन्ही संघांची गेल्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी अतिशय गचाळ झाली होती. या विश्वचषक स्पर्धेत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

या सामन्यात जर्मनीने 4-5-1 तर स्पेनने 4-3-3 या फॉर्मेशनसह सुरुवात केली. जपान विरुद्धच्या पराभवातून सावरत जर्मनीने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. बॉलवर नियंत्रण ठेवत उजव्या बगलेतून आक्रमक चाली रचल्या. स्पेनचा संघ डाव्या बगलेतून जास्त आक्रमण करत होता त्यामुळे त्यांची डावी बाजू आक्रमणासाठी पुढे सरकत होती. त्यामुळे त्या ठिकाणी तयार झालेल्या जागेचा फायदा जर्मन संघ आक्रमणासाठी उठवत होता. पहिल्या हाफमध्ये स्पॅनिश संघाने बॉल पझेशन स्वतःकडे राखत चाली रचल्या, पण जर्मनीच्या प्रेसिंग स्ट्रॅटेजीमुळे त्यांना खोलवर आक्रमण करता येत नव्हते. प्रेसिंग स्ट्रॅटेजीमुळे जर्मन संघाचे अनेक फाऊल होत होते. पहिल्या हाफमध्ये स्पॅनिश संघाला एक चांगली संधी मिळालेली. उजव्या बाजूने डॅनी अल्मो याने मारलेली किक जर्मन गोलरक्षक नोयारने उत्कृष्टपणे अडवली. जर्मनीलासुद्धा यानंतर 40 व्या मिनिटाला एक संधी मिळाली. फ्री किकवर अटोंनिओ रुडीगरने हेडद्वारे गोल नोंदवला, पण व्हीएआरमध्ये ऑफसाईड असल्यामुळे हा गोल नाकारण्यात आला.

दुसर्‍या हाफच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध भूमिका घेत चाली रचल्या. या सामन्यात पंचांनी अतिशय कडक निर्णय देत जर्मन संघातील तीन खेळाडूंना यलो कार्ड दाखवली. त्यामुळे जर्मन संघ नियंत्रणात असला तरी सेफ खेळत असल्यामुळे थोडासा विस्कळीत वाटत होता. याचा फायदा स्पॅनिश प्रशिक्षकांनी करून घेतला आणि 54 व्या मिनिटाला आल्वारो मोराटा याला टोरेसच्या ठिकाणी बदली खेळाडू म्हणून पाठवले. 62 व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले आणि मोराटाने जॉर्डी अल्बाच्या पासवर गोल नोंदवत स्पेनला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर जर्मनीला आक्रमक खेळाशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे जर्मन प्रशिक्षकांनी 70 व्या मिनिटाला एकदम चार बदल केले आणि आक्रमक रणनीती अवलंबली. हीच रणनीती त्यांच्या कामी आली आणि 83 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या निकलस फुलकृग याने मोठ्या डी मध्ये उजव्या बाजूने गोल नोंदवत जर्मनीला बरोबरी साधून दिली. दोन्ही संघांचे गोल बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या खेळाडूंनी केले. या सामन्यात स्पॅनिश गोलकिपरने उत्कृष्ट कामगिरी करत जर्मन संघाचे दोन गोल होण्यापासून रोखले. या सामन्यात जर्मनीचा अनुभवी खेळाडू थॉमस मुलरकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती, पण तो अपयशी ठरला.

या सामन्यातील एका गुणामुळे जर्मनीचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहिले असले तरी त्यांचा पुढचा सामना कोस्टारिका संघाबरोबर होणार आहे. या सामन्यात त्यांना चांगल्या गोल फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीत एशियन पावर हाऊस जपानने जर्मनीला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत खळबळ माजवली होती. या ग्रुपची दुसर्‍या फेरीनंतरची परिस्थिती पाहता कोणता संघ या गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरेल हे तिसर्‍या फेरीच्या सामन्यानंतरच निश्चित होईल. स्पेनचे नवीन प्रशिक्षक लुईस एन्रीकेज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या स्पेनला बाद फेरीत पोहोचण्यासाठी जपान बरोबरच्या शेवटच्या सामन्यात बरोबरी आवश्यक आहे. हा ग्रुप या स्पर्धेतील ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की जर्मनी, जपान, स्पेन आणि कोस्टारिका पैकी कोणत्या संघावर येते हे तिसर्‍या फेरीतील सामन्यानंतरच समजेल.

या स्पर्धेतील धक्कादायक निकालांचे सत्र सुरू असून ग्रुप ‘एफ’ मध्ये मोरोक्कोने बलाढ्य बेल्जियमचा 2-0 तर कोस्टारिकाने जपानचा 1-0 असा पराभव करत अनपेक्षित निकालांची नोंद सुरू ठेवली. बेल्जियमला या स्पर्धेतील संभाव्य विजेता म्हणून बघितले जाते, पण 90 मिनिटांच्या या खेळातील अनिश्चितता कोणत्या संघास धक्का देईल हे सांगता येत नाही. विश्वचषक स्पर्धा म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट 32 संघांत खेळली जाणारी स्पर्धा आहे. त्यामुळे कोणत्याही बलाढ्य संघाने इतर संघांना कमी न लेखता संपूर्ण क्षमतेने खेळ करत स्पर्धेत आपली वाटचाल सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अगोदर बाद फेरीपासून संघांची खरी स्ट्रॅटेजी दिसायची, पण आता बाद फेरीत पोहोचण्यासाठी बलाढ्य संघांना झुंज द्यावी लागत आहे. बहुदा ही नव्या युगाच्या फुटबॉलची नांदी असावी असे वाटते.

Back to top button