FIFA WC 2022 : मेस्सीने मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात विश्वविक्रमासह मॅराडोनाच्‍या विक्रमाशीही केली बरोबरी | पुढारी

FIFA WC 2022 : मेस्सीने मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात विश्वविक्रमासह मॅराडोनाच्‍या विक्रमाशीही केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीसाठी फुटबॉल विश्वचषक (FIFA WC 2022) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून २-१ गोल फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. मेस्सीने केलेल्या गोलनंतरही त्याचा संघ सामना जिंकू शकला नाही. मात्र, अर्जेंटिनाने दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन करत राऊंड १६ मध्ये खेळण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

२६ नोव्‍हेंबर रोजी झालेल्या मेस्किकोविरूध्दच्या सामन्यात मेस्सी अर्जेंटिनाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सामन्याच्या ६४व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ८७ व्या मिनिटाला त्याने फर्नांडिसला शानदार असिस्ट देऊन गोल करण्यात मदत केली. यासह मेस्सीने दोन खास विक्रम आपल्या नावावर केले.

पाच विश्वचषकांमध्ये असिस्ट करणारा पहिला खेळाडू

पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये आपल्या सहकाऱ्यांना गोलसाठी असिस्ट करणारा लिओनेल मेस्सी हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात त्याने फर्नांडिसला उत्कृष्ट पास दिला, ज्यावर त्याने गोल करत सामन्यात २-० अशी विजयी आघाडी घेतली. यासह फर्नांडिस अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने अर्जेंटिनासाठी २१ वर्षे ३१३ दिवस वय असताना विश्वचषक स्‍पर्धेत एक गोल केला. तर, मेस्सीने अर्जेंटिनासाठी २००६ मध्ये वयाच्या १८ वर्षे ३५८ दिवस वय असताना विश्वचषक स्‍पर्धेत पहिला गोल केला होता.

मेस्सी मॅराडोनाच्या विक्रमाशी बरोबरी

मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील गोलसह मेस्सीने फुटबॉल विश्वचषकातील २१ सामन्यांत आठ गोल केले आहेत. यासह त्याने दिग्गज मॅराडोनाची बरोबरी केली आहे. मॅराडोना यांनीही २१ विश्वचषक सामन्यांमध्ये आठ गोलही केले होते. या विश्वचषका स्पर्धेत मेस्सीने दोन सामन्यांत दोन गोल केले आहेत. त्याने स्पर्धेत आपली लय कायम ठेवली तर पुढच्या सामन्यात तो मॅराडोना यांना मागे टाकू शकतो.

अर्जेंटिनाने मेक्सिकोवर २-० ने केली मात

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाला सौदी अरेबियाविरुद्ध १-२ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी अर्जेंटिनाला त्यांचा दुसरा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता. पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता होती, परंतु या सामन्याच्या ६४व्या मिनिटाला मेस्सीने डी मारियाने दिलेल्या शानदार असिस़्टवर गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर मेस्सीने युवा खेळाडू एन्झो फर्नांडिसला असिस्ट केला. या संधीचे सोने करत फर्नांडिसने सामन्याच्या ८७व्या मिनिटाला गोल करून २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यातील विजयासह अर्जेंटिनाचा संघ क गटात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्जेंटिना पोलंडच्या एका गुणाने मागे आहे. अर्जेंटिनाचा शेवटचा गट सामना पोलंडशी १ डिसेंबर रोजी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेबारा वाजता आहे.

हेही वाचा;

Back to top button