सांगली : तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित; पालकांसह शासनही उदासीन | पुढारी

सांगली : तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित; पालकांसह शासनही उदासीन

इस्लामपूर; संग्रामसिंह पाटील :  सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, आदींसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातील मजूर ऊसतोडणीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मजुरांसोबत त्यांची मुलेही आली आहेत. त्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहावे लागत आहे. या मुलांना परिस्थितीमुळे आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागत आहे. त्यामुळे या मजुराप्रमाणे येणाऱ्या पिढीनेही ऊसतोडणीचे काम करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समाजातील कोणत्याही घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र ऊसतोड मजुरांची मुले हंगामात शिक्षणापासून वंचित राहिल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. कारखान्यांकडे ऊसतोड मजूर कुटुंबासह दाखल झाल्याने हंगाम काळात ही मुली शिक्षणापासून दूर राहिल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे या मुलांना भविष्यात आपल्या हातात ऊसतोडीसाठी आपल्या पालकाप्रमाणे कोयता घेण्याची वेळ येणार आहे. याचबरोबर या मुलांच्या अंगावर दिवसभर कपडे नसल्याचे पहावयास मिळते. तसेच ऊस तोडीच्या कामात गुंतल्याने मुलांच्या खाण्यापिण्याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. परिणामी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे मुले शिक्षणात प्रवाहात यावीत, यासाठी शासन मुलांना माध्यान भोजन, मोफत शिक्षण, मोफत पाठ्यपुस्तके आदी उपक्रम राबवत आहे. मात्र ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी शासन उपाययोजनांची अंमलबजावणी करताना पहावयास मिळत नाही. याला अपवाद म्हणजे हुतात्मा कारखान्याने साखर शाळा उपक्रम सुरू ठेवला आहे.

   हुतात्मा पॅटर्न राबविण्याची गरज

ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणायचे असेल तर हुतात्मा साखर कारखान्याने राबवलेला साखर शाळा उपक्रम अन्य कारखान्यांनी राबविणे आवश्यक आहे. जेणेकरून हंगामातील चार महिन्यात ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील. त्यामुळे शासनासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा उभारावी, अशी मागणी ऊसतोड मजुरांमधून होत आहे.

आमचे आयुष्य कोयता धरून ऊस तोडण्यात गेले आहे. गरिबी असल्याने पोटापाण्याचा प्रश्न आहे. आम्ही हलाखीत जीवन घालवले. मात्र मुलांनी उच्चशिक्षित होऊन साहेब झाले पाहिजे, असे आम्हाला वाटते.

  – अरुण लोखंडे, ऊसतोड मजूर रा. बीड

Back to top button