FIFA WC 2022 : द. कोरिया विरुद्ध उरुग्वेचा सामना बरोबरीत सुटला | पुढारी

FIFA WC 2022 : द. कोरिया विरुद्ध उरुग्वेचा सामना बरोबरीत सुटला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरुवारी (दि.२४) फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत (FIFA WC 2022) ‘एच’ गटातील उरुग्वेचा आणि द. कोरिया या संघात सामना खेळवण्यात आला. उरूग्वेचा हा १४ वा फिफा विश्वचषक आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल नोंदवण्याच्या सोप्या संधी गमावल्याने कोणत्याही संघाला सामन्यात गोल करता आला नाही. यामुळे हा सामना ०-० ने बरोबरीत सुटला.

त्याचबरोबर ११ वा फिफा विश्वचषक खेळणाऱ्या द. कोरिया हा संघ आशियाई देशांमध्ये सर्वाधिक विश्वचषक खेळणार संघ ठरला आहे. १९८६ पासून हा संघ सतत ही स्पर्धा खेळत आहे. फिफा क्रमवारीत उरुग्वे १४ व्या स्थानावर आहे, तर द. कोरिया २८ व्या क्रमांकावर आहे. हा सामना एज्युकेशन सिटी स्टेडियमवर खेळवण्यात आला. (FIFA WC 2022)

नुनेझ आणि सुआरेझ यांनी संधी गमावली

सुरुवातीला द. कोरियाने सामन्यावर वर्चस्व राखले. संघाकडे ६० टक्के चेंडूचा ताबा होता. त्याचवेळी उरुग्वेचा संघ संघर्ष करत होता. २२ व्या मिनिटाला उरुग्वेला गोल करण्याची उत्तम संधी होती. परंतु नुनेझ कोरियाच्या बॉक्सच्या बाहेरून शूट करण्यात अयशस्वी ठरला. त्याचवेळी सुआरेझचीही संधीही हुकली.

पहिल्या हाफ टाइममध्ये कोरियाकडे ५१ टक्के बॉलचा ताबा होता तर उरुग्वेकडे ४९ टक्के चेंडूचा ताबा होता. उरुग्वेने गोलवर चार फटके मारण्याचा प्रयत्न केला. यापैकी एकच टार्गेटवर होता. मात्र, संघाला एकही गोल करता आला नाही. त्याचवेळी कोरियाने दोन फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी एकही लक्ष्यावर राहिला नाही. हाफ टाईमपर्यंत उरुग्वेकडे तीन आणि कोरियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण त्यात दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही.

द. कोरिया आणि उरुग्वे संघाला हाफ टाईमपर्यंत एकही गोल करता आला नाही. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी काही सोप्या संधी गमावल्या. ३४ व्या मिनिटाला कोरियाच्या ह्वांग युई-जो याला उरुग्वेच्या डेंजर झोन बाहेरून गोल करण्याची सोपी संधी होती, मात्र त्याचा शॉट गोलपोस्टच्या बाहेर गेला. यानंतर ४४ व्या मिनिटाला उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडिनचा कॉर्नर किकवर हेडरच्या मदतीने गोल करण्याची संधी गमावली. गॉडिनचे हेडर कोरियन गोलपोस्टला लागून बॉल मैदानाच्या बाहेर गेला.

दुसऱ्या हाफवर उरुग्वेची पकड

दुसऱ्या हाफमध्ये उरुग्वेने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला एडिन्सन कवानीला लुईस सुआरेझचा बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आले. कवानी मैदानात उतरल्यानंतर त्याने संघाचे खाते उघडण्यासाठी खोलवर चढाया करण्याचा प्रयत्न केला. परंतु द. कोरियाच्या खेळाडूंनी केलेल्या बचावामुळे उरूग्वेला गोल करता आला नाही. सामन्याच्या पूर्ण वेळेत दोन्ही संघांना एकही गोल न करता आल्यामुळे हा सामना ०-० अशा गोल फरकाने बरोबरीत सुटला.

गेल्या सात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उरूग्वे

गेल्या सात फिफा विश्वचषक स्पर्धेत उरुग्वेने केवळ एकदाच सलामीचा सामना जिंकला आहे. तीन सामने अनिर्णित राहिले आणि तीनमध्ये उरुग्वे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. उरुग्वेचा एकमेव विजय २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तविरुद्धच्या सलामीच्या लढतीत केला होता.

हेही वाचा;

Back to top button