वर्धा : सेलसुरा येथे फिल्टरसह विहिरीच्या मागणीसाठी नदीत उतरून आंदोलन | पुढारी

वर्धा : सेलसुरा येथे फिल्टरसह विहिरीच्या मागणीसाठी नदीत उतरून आंदोलन

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा तालुक्यांतील सेलसुरा येथे मागील काही महिन्यांपासून सातत्याने गढूळ पाणी पुरवठा होत आहे. मागणी करूनही पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांनी फिल्टरसह विहिरीच्या मागणीसाठी नदी पात्रात उतरुन आंदोलन केले. आंदोलनात ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांसह सदस्य तसेच नागरिकांनी सहभाग नोंदविला.

देवळी वर्धा मार्गावरील सेलसुरा येथील सुमारे १७०० लोकसंख्या असून गावात नळयोजनेद्वारा पाणी पुरवठा करण्यात येतो. गावालगतच्या नदीला आलेल्या पुरात नदी काठावर असलेल्या विहिरीच्या भिंतीला तडे गेलेत. त्यामुळे नदी पात्रातील पाणी थेट विहिरीत जाते. विहिरीतील पाणी जलकुंभात साठविले जाते. तेच पाणी पुढे नळाद्वारे नागरिकांना पुरवठा केले जाते.

पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना पुरामुळे पाणी गढूळ असावे, असा अंदाज होता. पण, आताही गढूळ पाणी येत असल्याने विहिरीला तडे गेले असल्याचे नागरिकांनी सांगितले. सातत्याने गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार माहिती देऊनही प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत गंभीरतेने लक्ष दिल्या गेले नाही.

अखेर फिल्टर बसविण्यासह नवीन विहिरीचे बांधकाम करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. महिला, पुरुषांनी नदी पात्रातील पाण्यात उतरून घोषणा देत आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच अधिकार्‍यांनी संपर्क साधला. आंदोलनात सरपंच, उपसरपंच, सदस्यांसोबतच महिला, पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.

दरम्यान, गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लवकरच विहिरीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अधिक वाचा :

Back to top button