FIFA WC 2022 : इकडे कचरा, तिकडे कचरा.. कतारचे मैदान स्वच्छ करायला जपानी चाहते सरसावले! | पुढारी

FIFA WC 2022 : इकडे कचरा, तिकडे कचरा.. कतारचे मैदान स्वच्छ करायला जपानी चाहते सरसावले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेला (FIFA WC 2022) सुरूवात होऊन चार दिवस झाले आहेत. दरम्यान, साखळी फेरीपासूनच स्पर्धेतील चूरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फुटबॉलपटू आपआपल्या संघाना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. अशातच मैदानात उपस्थित असणारेही चाहतेही मागे राहिलेले नाहीत. जर्मनी विरुद्ध जपान या सामन्यात त्याचा प्रत्यय आला. जिथे जपानी चाहत्यांनी केलेल्या एका कृतीने जगाला आदर्श घालून दिला आहे.

कतारमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांचे धक्कादायक निकाल पहायला मिळाले. पहिल्यांदा सौदी अरेबियाने मेस्सीच्या अर्जेंटिनाचा पराभव करून सर्वांना चकित केले. तर त्यानंतर जपानने बलाढ्य जर्मनीवर ऐतिहासिक विजय नोंदवला. हाफ टाईममध्ये 1-0 असे पिछाडीवर जाऊनही जपानी संघाने शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता झुंझार खेळाचे प्रदर्शन केले आणि दिग्गज जर्मनी संघाला 1 विरुद्ध 2 गोल फरकाने लोळवले. दरम्यान, जपानी संघाने सामन्यात विजय मिळवला असतानाच मैदानात उपस्थित असणा-या त्यांच्या चाहत्यांनी अवघ्या जगाची मने जिंकल्याचे समोर आले आहे.

सामन्यातील विजयानंतर जपानच्या चाहत्यांनी आपल्या चांगल्या सवयीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. सामना संपल्यानंतर उपस्थित प्रेक्षक स्टेडियमधून बाहेर पडत होते. पण, जपानचे चाहते मैदानावरच थांबले. (FIFA WC 2022) ते सर्व एकत्र येऊन प्रेक्षक गॅलरीतील कचरा गोळा करून पिशवीमध्ये भरू लागले. मैदनावरच्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, पडलेले खाद्यपदार्थ आणि इतर कचरा पिशवीत भरण्यास जपानी चाहत्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी काही मिनिटांतच संपूर्ण स्टेडियम स्वच्छ केले. त्याचवेळी जपानच्या खेळाडूंनीही आपली ड्रेसिंग रूम पूर्णपणे स्वच्छ केली. फिफाने (FIFA) आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर करत ‘जपानी खेळाडूंनी आपली ड्रेसिंग रूम पूर्णपणे स्वच्छ केली,’ असे म्हणत त्यांच्या या आदर्शवत कृतीला एकप्रकारे सलामच केला.

जपानी चाहत्यांचा साफसफाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जपानचे चाहते आणि जापनी संस्कृतीचे जगभरातून कौतुक होत आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाच्या माध्यमातून कतार आपली संस्कृती आणि धर्म जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असून स्वत:ची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जपानच्या चाहत्यांनी काही मिनिटे मेहनत करून आपल्या संस्कृतीचा ठसा उमटवला आहे.

एका जपानी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील महिला म्हणते, ‘कुणीही केलेला कचरा कधीही त्या ठिकाणी ठेवत नाही. जपानचे नागरिक कधीही कचरा करत नाहीत. आम्ही त्या जागेचा आदर करतो.’ हा व्हिडिओ उमर फारूख नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जापनीज नागरिक म्हणतो की, स्वच्छतेचे काम आम्ही कधीच प्रसिद्धीसाठी करत नाही. आम्ही आमची संस्कृती जपण्यासाठी आणि जागेचा आदर राखण्यासाठी त्या ठिकाणाची साफ- सफाई करत असतो.’

Back to top button