Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत! म्हणाला, ‘...स्वप्न पूर्ण झाले’ | पुढारी

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत! म्हणाला, ‘...स्वप्न पूर्ण झाले’

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) कहाणी अनेक चढउतारांनी भरलेली आहे. 2004 मध्ये टीम इंडियात (Team India) पदार्पण करणाऱ्या कार्तिकने 2019 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याची कारकीर्द जवळपास संपली असे सर्वांनीच मानले. मात्र कार्तिकने कष्ट आणि सातत्याच्या जोरावर आयपीएलमध्ये तुफानी खेळी साकारल्या आणि आपल्यासाठी भारतीय टी 20 संघाचे (T20 Team India) दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्याने शानदार पुनरागमन केले.

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत कार्तिक टीम इंडियाचा अविभाज्य भाग होता. मात्र त्याला या स्पर्धेत फारसे काही करता आले नाही. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. इंग्लंडविरुद्धचा तो सामना भारतीय संघ 10 विकेट्सने हरला. भारताच्या पराभवाने कार्तिक आणि अश्विनच्या टी-20 कारकिर्दीचा अंत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता कार्तिकने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यानंतर असे मानले जात आहे की तो लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्तिकने टी-20 विश्वचषकादरम्यानच्या त्याच्या पुनरागमन आणि संस्मरणीय क्षणांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो की, ‘टीम इंडियासाठी टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि असे करणे अभिमानास्पद आहे. आम्ही अंतिम लक्ष्य गाठू शकलो नाही, परंतु या स्पर्धेने माझे आयुष्य अनेक संस्मरणीय क्षणांनी भरले. माझे सर्व सहकारी खेळाडू, कोच आणि मित्रांचे धन्यवाद. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी सातत्याने समर्थन दिले.’

कार्तिकची कारकीर्द कशी राहिली?

37 वर्षीय दिनेश कार्तिकने भारतासाठी 26 कसोटीत 25 च्या सरासरीने 1025 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वात मोठी खेळी 129 धावांची आहे. त्याचे कसोटीतील हे एकमेव शतक आहे. त्याच वेळी, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये, कार्तिकने 30.21 च्या सरासरीने 1752 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 79 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून सात अर्धशतके झळकली. 60 टी-20 खेळलेल्या कार्तिकने 48 डावांमध्ये 26.38 च्या सरासरीने आणि 142.62 च्या स्ट्राइक रेटने 686 धावा केल्या. त्याची सर्वात मोठी खेळी 55 धावांची होती. कार्तिकला टी 20 मध्ये केवळ एक अर्धशतक झळकावता आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

 

Back to top button