Protest in FIFA WC : ‘लव्ह आर्म बँड’वरून कतारमध्ये वातावरण तापले, तोंडावर हात ठेवून जर्मन खेळाडूंनी केला फिफाचा निषेध | पुढारी

Protest in FIFA WC : ‘लव्ह आर्म बँड’वरून कतारमध्ये वातावरण तापले, तोंडावर हात ठेवून जर्मन खेळाडूंनी केला फिफाचा निषेध

पुढारी ऑनलाईन डेस्क : Protest in FIFA WC : कतारमध्ये खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक (FIFA WC) स्पर्धेदरम्यान नव्या वादाची भर पडली आहे. बुधवारी (23 नोव्हेंबर) जपानविरुद्धच्या सामन्यापूर्वी फोटोसेशन दरम्यान जर्मन संघाच्या खेळाडूंनी तोंडावर हात ठेवले आणि फिफाचा निषेध नोंदवला. फिफाने ‘लव्ह आर्म बँड’ न घालण्याच्या निर्णयाला जर्मन खेळाडूंनी कडाडून विरोध केल्याचे त्यांच्या या कृतीतून समोर आले आहे.

कतारमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा (FIFA World Cup 2022) सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे. प्रेक्षकांवर घालण्यात आलेल्या अनेक निर्बंधांनंतर आता एलजीबीटीडब्ल्यू (LGBTW)च्या समर्थनावरून वाद सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू झाल्यानंतर 8 संघांच्या खेळाडूंनी विश्वचषकादरम्यानच्या सामन्यांमध्ये समलैंगिक संबंधांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. तसेच LGBTW समुदायाचे प्रतीक असणारा वन लव्ह बँड हातावर बांधून मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. पण फिफाने याला आक्षेप घेतला. जर एखादा संघ किंवा कोणताही खेळाडू वन लव्ह बँड हातावर बांधून मैदानात उतरला तर तो फिफाच्या नियमांचा भंग ठरेल आणि अशी कृती करणा-या खेळाडूंवर बंदी घालण्यात येईल असा इशारा फिफाने दिला. (Protest in FIFA WC german football players protest against fifa)

फिफा (FIFA) विश्वचषक स्पर्धा ज्या कतारमध्ये होत आहे तिथे समलैगिक संबंधांवर बंदी आहे. त्यामुळे या जागतिक स्पर्धेदरम्यान नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे फिफाने कठोर निर्णय घेत LGBTW च्या समर्थनार्थ मैदानावर उतरणारे संघ आणि खेळाडूंवर दबाव टाकला. यात जर्मन संघाचाही समावेश होता. अखेर जर्मन संघाच्या खेळाडूंनी फिफाच्या निर्णयाविरुद्ध अनोख्या पद्धातीने आवाज उठवला. तोंडावर उजवा हात ठेवून एक प्रकारे आमचा आवाज दाबला जात असल्याचे या कृतीतून निदर्शनास आणले. जर्मन फुटबॉल फेडरेशनही आपल्या खेळाडूंची बाजू घेतली आणि एक सूचक ट्विट करत जगाचे लक्ष वेधले. ‘ही राजकीय भूमिका नाही, मानवी हक्कांच्या मुद्द्यावर आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. आर्मबँडवर बंदी घालणे म्हणजे आमच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्यासारखे आहे,’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडले. (Protest in FIFA WC german football players protest against fifa)

वन लव्ह आर्मबँडवर बंदी का आली? (Protest in FIFA WC)

‘वन लव्ह’ आर्मबँडच्या माध्यमातून फुटबॉलपटूंना सर्व प्रकारच्या भेदभावाचा निषेध करायचा होता. इंग्लंड, वेल्स, बेल्जियम, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि डेन्मार्कच्या फुटबॉल संघटनांनी सप्टेंबरमध्ये जाहीर केले की त्यांचे कर्णधार विश्वचषक सामन्यांदरम्यान वनलव्ह बँड परिधान केलेले दिसतील. पण या आर्मबँडला फिफाने विश्वचषक स्पर्धा सुरू होताच बंदी घातली.

वास्तविक, इंद्रधनुष्याच्या रंगाचा हृदयाचा आकार ‘वन लव्ह’ आर्मबँडवर राहतो. कतारमध्ये फिफा 2022 चे आयोजन केले जात आहे, जिथे समलैंगिकता हा गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षा दिली जाते. रेनबो बँड हा एलजीबीटीक्यू समुदायाचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणूनच रेनबो आर्मबँड स्पष्टपणे कतारच्या कायद्याच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत, फिफाला आयोजक देशाबरोबर कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता, म्हणूनच फुटबॉलच्या सर्वोच्च संस्थेने नियमांचा हवाला देत हा बॅड परिधान करण्यास परवानगी दिली नाही.

जर्मनीच्या खेळाडूंशिवाय त्यांच्या मंत्री नॅन्सी फीजर यांनीही फिफाचा विरोध केला. प्रत्यक्ष सामना पहायला आल्या असता त्यांनी ‘वन लव्ह आर्मबँड’ परिधान केला होता. एवढेच नाही फिजर या सामना पहायला फिफा प्रमुख जियानी इन्फँटिनो यांच्या शेजारी बसल्या होत्या. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Back to top button