Qatar vs Ecuador : इक्वाडोरने यजमान कतारला पराभूत करत स्पर्धेत दिली विजयी सलामी | पुढारी

Qatar vs Ecuador : इक्वाडोरने यजमान कतारला पराभूत करत स्पर्धेत दिली विजयी सलामी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि. २०) फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर या संघात खेळवण्यात आला. या सामन्याला भारतीय वेळेनुसार ९.३० वाजता सुरूवात झाली. सामन्याच्या आधी अल बायत स्टेडियमवर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी जगभरातील अनेक कलाकरांनी सादरीकरण  केले.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळी केली. याचा फायदा इक्वाडोर संघाला झाला. सामन्याचा तिसऱ्या मिनिटाला इक्वाडोरचा कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने गोल करत संघाचे खाते उघडले. परंतु सामन्याच्या रेफरी यांनी गोलची पडताळणी केली असता. त्यांना कर्णधार व्हॅलेन्सियाने ऑफ साईडमधून गोल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी हा गोल अवैध घोषित केला. तरीही दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले जात होते.

सामन्याच्या १६ व्या मिनिटाला इक्वाडोच्या खेळाडूला कतारच्या बचावपटूने डेंजरझोनमध्ये अवैधरित्या अडवल्यामुळे रेफरींनी इक्वडोर संघाला पेनल्टी किक बहाल केली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत संघाचा कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने कोणतीही चूक करता गोल करत संघाला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लगेचच कतारने गोलची परत फेड करण्याच्या इराद्याने इक्वाडोरच्या गोलच्या दिशेने चढाई केली. परंतु त्याच्या संघाच्या बचावपटूंनी कतारचा प्रतिहल्ला परतावून लावला.

सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने हेडरने संघासाठी आणि वैयत्तिक दुसरा गोल नोंदवून संघाला सुरक्षित आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला कतारने गोल करण्याची चांगली संधी निर्माण केली होती. परंतु संघाचा खेळाडू अली याने चेंडू हेडने गोल पोस्टच्या बाहेर मारून सामन्यातील आघाडी कमी करण्याची संधी हुकवली.

दुसऱ्या हाफची सुरूवातदेखील दोन्ही संघांनी आक्रमक पध्दतीने केली. यावेळी कतारचा संघ आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.परंतु इक्वाडोर संघातील बचावपटूंची भिंत कतारच्या खेळाडूंना अखेर पर्यंत भेदता आली नाही. तर,इक्वाडोरचा संघ आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी चाली रचून गोल करण्याचा प्रयत्न करत होता. संपूर्ण सामन्यामध्य़े इक्वाडोर संघाने बाॅलचा ताबा अधिक काळ आपल्याकडे ठेवला होता. दुसऱ्या हाफमध्ये इक्वाडोरचा संघ शॉर्ट पासिंग करत गोल करण्यासाठी चढाई करत होते.

सामन्यात अनेक प्रयत्न करूनही कतारला गोल नोंदवता आला नाही. तर इक्वाडोरचा कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने केलेल्या दोनच्या आघाडी कायम ठेवत इक्वाडोरने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान कतारचा २-० अशा फरकाने पराभव करत स्पर्धेत विजयाचे खाते उघडले.

हेही वाचा;

Back to top button