पुणे : नवले ब्रीजवर 40 हून अधिक वाहनांचा चुराडा | पुढारी

पुणे : नवले ब्रीजवर 40 हून अधिक वाहनांचा चुराडा

पुणे/ धायरी; : पुढारी वृत्तसेवा : पुणे : नवले ब्रीजवर 40 हून अधिक वाहनांचा चुराडा; दीड किमीपर्यंत मालवाहू ट्रकने गाड्यांना उडवलेमुंबई-बंगळुरू महामार्गावर सातार्‍याकडून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या मालवाहू ट्रकने पुलावरून जाणार्‍या व वाहतूक कोंडीत थांबलेल्या तब्बल 40 हून अधिक वाहनांना खेळण्यातल्या गाड्याप्रमाणे उडवले. कडाक्याच्या थंडीत नवले पुलावरील हा थरकाप पहाताना अनेकांना भोवळ आली. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात चारजण गंभीर तर दहा पेक्षा अधिक जण किरकाळ जखमी झाले आहेत. नवले ब्रिजवरील आजवरचा हा सर्वात मोठा अपघात आहे.

नवले ब्रीजवर कडाक्याच्या थंडीत रविवारी मालवाहू ट्रकने अक्षरश: अपघाताचे तांडवच केले. भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकच्या ( क्रमांक एपी टीई 5858 ) चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तेथून जाणार्‍या एकेका वाहनाला उडवत अजस्त्र ट्रक पुढे जात होता. अनेक कार खेळण्याप्रमाणे चिरडून टाकत पुढे जाणारा हा ट्रक 40 हून अधिक कार आणि रिक्षांचा चेंदामेंदा करून थांबला. तेव्हा अनेक वाहनांतून जखमींचा आक्रोश ऐकू येत होता. काही कळायच्या आत ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळून गेला. भिषण आवाजाने संपूर्ण नवले ब्रिज हादरला. ते पाहून तेथून जाणार्‍या वाहनचालकांनी हातातली वाहने सोडून अपघात ग्रस्तांकडे धाव घेतली. चेंदामेंदा झालेल्या कारमधून गंभीर जखमींना काढण्याची घाई सुरू झाली. यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर दहा पेक्षा जास्त लोकांना जबर मार लागला.

अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल आणि पोलिसांची धावाधाव

घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल, अ‍ॅम्बुलन्स, छोट्या मोठ्या क्रेन काही मिनिटांतच घटनास्थळावर पोहचल्याने जखमींना तात्काळ दवाखान्यापर्यंत पोहचवता आहे. रात्री उशीरापर्यंत या जखमींवर उपचार सुरू होते. रात्री बारापर्यंत या रस्त्यावर अडकलेली वाहने काढण्याचे काम सुरू होते. नवले ब्रिजपासून ते थेट कात्रज नवीन बोगद्यापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अग्निशमन दल तसेच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि हेल्प रायडर्स संघटनेच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले.

अपघातांचे सत्र कायम

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. शुक्रवारी (19 नोव्हेंबर) बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ भरधाव कारने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. अपघातात चार वर्षांच्या बालकासह तिघे जण जखमी झाले होते. बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ तीव्र उतारावर वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात झाले आहेत. बाह्यवळण मार्ग वाहतुकीस खुला झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या अपघातात 60 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक अपघात नवले पूल परिसरात घडले आहेत.

नवले पुलाजवळ भरधाव टँकरने धडक दिल्याने आमच्या माहितीनुसार 25 वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात कोणी मृत्यमुखी पडले नसल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे

Back to top button