औरंगाबाद : पत्नीचा खून करून पती थेट पोलिस ठाण्यात हजर | पुढारी

औरंगाबाद : पत्नीचा खून करून पती थेट पोलिस ठाण्यात हजर

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : आधी सासू-सासऱ्यांशी पटले नाही, आता मुलागा-सुनेशी पटत नाही. पतीसोबतही सतत वाद सुरु असतो. त्यामुळे पतीने पत्नीचा गळा आवळून खून करून पती स्वत: चिकलठाणा पोलीस ठाण्यात हजर झाला. ठाण्यात येऊन त्याने साहेब, रोजची कटकट एकदाची संपविली म्हणत पत्नीच्या खुनाची कबुली दिली.

ही घटना बीड रोडवरील आपतगाव येथे रविवारी ( दि.२० डिसेंबर) दुपारी २ वाजता घडली. दरम्यान, या प्रकरणात तक्रार न आल्याने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर सरकारतर्फे पोलिस फिर्याद देतील, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी दिली.

सुनीता कडूबा हजारे (३८, रा. आपतगाव, ता. औरंगाबाद) असे मृत महिलेचे, तर कडूबा भागाजी हजारे (४२) असे ठाण्यात येऊन कबुली देणाऱ्या पतीचे नाव आहे. अधिक मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी २ वाजता कडूबा हजारे हा चिकलठाणा पोलीस ठाण्यात आला. त्याने साहेब, मी पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. रोजची कटकट एकदाची संपविली, अशी माहिती दिली.

त्याच्या सांगण्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक बालाजी ढंगारे, हवालदार दीपक देशमुख, रवी दाभाडे, बाबासाहेब मिसाळ हे त्याच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोलिसांनी सर्व माहिती जाणून घेतली. मृताच्या मुलाने आईला सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल. तोपर्यंत जर नातेवाईकांकडून तक्रार आली नाही तर पोलिसांतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा;

Back to top button