FIFA WC 2022 : जाणून घ्या… फुटबॉल विश्वचषकातील ‘न’ मोडलेल्या खास विक्रमांबद्दल | पुढारी

FIFA WC 2022 : जाणून घ्या... फुटबॉल विश्वचषकातील ‘न’ मोडलेल्या खास विक्रमांबद्दल

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये रविवारपासून (दि,२० नोव्हेंबर) फिफा विश्वचषकाला (FIFA WC 2022) सुरुवात होत आहे. ही स्पर्धा प्रथमच मध्य-पूर्व देशात आयोजित केली जात आहे. तसेच, पहिल्यांदाच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येत आहे. दरवर्षी विश्वचषकात अनेक विक्रम होतात आणि अनेक मोडले जातात. यापैकी काही बऱ्याच काळापासून न मोडलेले काही विक्रम आहेत.

विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू

ब्राझीलचा माजी खेळाडू पेले हे विश्वचषक स्पर्धेमध्ये गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू आहेत. त्यांनी १९ जून १९५८ रोजी वयाच्या १७ वर्षे २३९ दिवस व्या वर्षी वेल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात गोल केला होता. पेले यांचा हा विक्रम ६८ वर्षांपासून कायम आहे. त्यांनी मेक्सिकोच्या मॅन्युएल रोसासचा विक्रम मोडत कमी वयात विश्वचषक स्पर्धेत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. रोसासने अर्जेंटिनाविरुद्ध १९ जुलै १९३० रोजी वयाच्या १८ वर्षे ९३ वर्षी गोल केला होता.

विश्वचषकात हॅट्ट्रिक करणारा सर्वात तरुण खेळाडू

पेले विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक करणारे सर्वात तरुण फुटबॉलपटू आहेत. १९५८ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्सविरुद्ध त्यांनी हॅट्ट्रिक केली होती. यामुळे ते विश्वचषक स्पर्धेक हॅट्ट्रिक करणारे तरुण खेळाडू ठरले. फ्रान्सविरुद्धच्या हॅटट्रिकच्या दिवशी त्यांचे वय १७ वर्षे २४४ दिवस इतके होते.

हा खास विक्रमही पेले यांच्या नावावर

पेले हे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोल करणारे सर्वात तरुण खेळाडूही आहेत. त्यांनी १९५८ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत स्वीडनविरुद्ध गोल करत हा इतिहास रचला होता. पेले यांनी विजेतेपदाच्या लढतीत वैयक्तिक दोन गोल केले होते. त्यावेळी ब्राझीलने हा सामना ५-२ अशा गोल फरकाने जिंकला होता. त्यांनी या स्पर्धेत एकूण सहा गोल केले होते.

सध्या युरोपियन फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मनकडून खेळणारा केलियन एम्बाप्पेने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सकडून गोल केला होता. असे करणारा फ्रान्सचा केलियन एमबाप्पे हा २० वर्षांखालील दुसरा खेळाडू ठरला. एम्बाप्पेने २०१८ मध्ये क्रोएशियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गोल केला होता. त्यांच्या संघाने अंतिम सामन्यात क्रोएशियावर ४-२ ने विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले होते. त्यावेळी एम्बाप्पेचे वय १९ वर्ष २०७ दिवस इतके होते.

सामना पाहण्यासाठी जमले सर्वाधिक प्रेक्षक

१९५० साली ब्राझील येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी सर्वाधिक प्रेक्षक मैदानावर जमले होते. त्यावेळी मैदानावर १,७३,८५० लोक अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. हा सामना ब्राझील आणि उरुग्वे यांच्यात खेळवण्यात आला होता. ब्राझीलने त्यांच्या घरच्या मैदानावर सामना १-२ ने गमावला होता. हा सामना ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथील माराकाना स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात ब्राझीलला पराभूत करून उरुग्वेचा संघ विजेता ठरला.

सर्वात वेगवान गोलचा विक्रम

विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद गोल करण्याचा विक्रम तुर्कीच्या हकन सोकुरच्या नावावर आहे. त्याने २००२ मध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध अवघ्या ११ सेकंदात गोल केला होता.

फायनलमध्ये युरोपीय संघांचे वर्चस्व

आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत युरोपीय संघांचे वर्चस्व राहिले आहे. २१ पैकी १९ फायनलमध्ये युरोपमधील देशाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा;

Back to top button