जम्मू काश्मीर : हिमस्खलन अपघातात धुळे जिल्ह्यातील चिंचखेड येथील जवान शहीद | पुढारी

जम्मू काश्मीर : हिमस्खलन अपघातात धुळे जिल्ह्यातील चिंचखेड येथील जवान शहीद

धुळे, पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागात हिमस्खलनाने झालेल्या अपघातात तीन जवान शहीद झाले. या अपघातात धुळे जिल्ह्यातील चिंचखेडे येथे राहणाऱ्या सैन्य दलातील नायक पदावर असलेल्या मनोज लक्ष्मण गायकवाड यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले.  शहीद जवान मनोज गायकवाड यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चिंचखेडे गावात आणले जाणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सैन्य दलाशी पाठपुरावा करत आहे.

धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथे राहणारे मनोज लक्ष्मण गायकवाड (वय ४१) हे सैन्य दलात 2001 मध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी सैन्य दलात विविध भागांमध्ये सेवा बजावली. गेल्या 21 वर्षांपासून ते देशसेवा करत असून सध्या नाईक पदावर कार्यरत होते. सैन्यामध्ये त्यांचे मूळ युनिट 23 फिल्ड वर्कशॉप असून सध्या ते जम्मू काश्मीर मधील 56 राष्ट्रीय रायफल येथे सेवा बजावत होते.

दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागात 56 राष्ट्रीय रायफल पाच जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. या पाच जणात मनोज गायकवाड यांचा समावेश होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी अचानक हिमस्खलन झाले. या झालेल्या अपघात गस्तीवर असणारे पाच ही जवान बर्फाखाली दबले गेले. या अपघातात दोना इतर जवानांसह कर्तव्य बजावताना मनोज गायकवाड हे शहीद झाले. अन्य दोन जवानांना वाचविण्यात लष्काराला यश आले आहे.

शहीद जवान मनोज गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी असून त्यांना ही माहिती देण्यात आली आहे. शहीद जवानाचा पार्थिव चिंचखेडे येथे कधी आणण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सैन्य दला समवेत पाठपुरावा करत आहे. या घटनेमुळे गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून धुळे तालुक्यातील चिंचखेडे परिसरात शोकाकूल वातावरण झाले आहे.

हेही वाचा 

यवतमाळ : पेट्रोल पंपाच्या टाकीतून ८ लाखांच्या डिझेलची चोरी

सिंधुदुर्ग: गावपळणीनिमित्त निसर्गाच्या सानिध्यात चिंदरवासीय लुटताहेत आनंद

जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; ‘अभाविप’चे आंदोलन

Back to top button