Cricket Formats : क्रिकेटच्‍या प्रत्येक फॉर्मेटसाठी असणार वेगळा कर्णधार ? 'बीसीसीआय'ची नवीन निवड समिती घेणार लवकरच निर्णय | पुढारी

Cricket Formats : क्रिकेटच्‍या प्रत्येक फॉर्मेटसाठी असणार वेगळा कर्णधार ? 'बीसीसीआय'ची नवीन निवड समिती घेणार लवकरच निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) चेतन शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखालील राष्‍ट्रीय निवड समिती बरखास्‍त केली आहे. आता नवीन निवड समिती नेमण्‍यात येणार असून, यानंतर कसोटी, वन डे आणि टी-20 अशा क्रिकेटमधील( Cricket Formats ) प्रत्‍येक फॉर्मेटसाठी टीम इंडियाचा वेगळा कर्णधार असावा, असा विचार ‘बीसीसीआय’ करत आहे.

आता मिशन २०२४, टी-२०साठी असेल वेगळा कर्णधार

या संदर्भात ‘टाइम्‍स ऑफ इंडिया’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, ‘बीसीसीआय’ने नियुक्‍ती केलेल्‍या राष्‍ट्रीय निवड समितीमधील
सदस्‍य पाच वर्षांपर्यंत काम करु शकतो. आता २०२४ मध्‍ये होणार्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍यासाठी नवीन संघ तयार करण्‍याचे उद्दिष्ट ठेवण्‍यात आले आहे. यासाठी टी-२० फॉर्मेटमध्‍ये वेगळा कर्णधार ठेवण्‍यास प्राधान्‍य देण्‍यात येणार आहे.

Cricket Formats : वन डेचे नेतृत्त्‍व रोहित शर्माकडेच राहण्‍याची शक्‍यता

आता २०२३ मध्‍ये भारतात होणार्‍या वन डे विश्‍वचषक स्‍पर्धेपर्यंत रोहित शर्मा यांच्‍याकडे वन डेचे नेतृत्त्‍व कायम ठेवण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. मात्र आता टी-२० आणि कसोटीसाठी कोणाकडे नेतृत्त्‍व दिले जाणार याची उत्‍सुकता कायम राहणार आहे.

चेतन शर्मांच्‍या नेतृत्त्‍वाखालील समिती नेहमीच चर्चेत

चेतन शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखालील राष्‍ट्रीय निवड समिती सुरुवातीपासून चर्चेत होती. भारताने कसोटी विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात पराभव झाला होता. यानंतर २०२१ टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताचे आव्‍हान साखळी सामन्‍यांमध्‍येच संतुष्‍टात आले होते. त्‍यानंतर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका आणि वन डे मालिकेमध्‍येही पराभवाचा सामना करावा लागला. आशिया चषक टी-२० स्‍पर्धेतही अंतिम फेरीत टीम इंडिया पोहचू शकली नाही. यानंतर नुकत्‍याच झालेल्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताचा उपांत्‍य फेरीत इंग्‍लंडकडून नामुष्‍कीजनक पराभव झाला.

विराट कोहली याला कर्णधारपदावरुन हटविण्‍यात आले. यानंतर सलग एक वर्षांहून अधिक काळ एक मजबूत संघ निवडण्‍यात समितीला अपयश आल्‍याची टीका होत आहे. आयपीएल स्‍पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि चेतन शर्मा यांच्‍यातील मतभेद झाल्‍याची चर्चा आहे. त्‍यामुळेच नुकत्‍याच झालेल्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत चेतन शर्मा यांनी सराव सत्रांना हजेरी टाळल्‍याचीही चर्चा आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button