FIFA WC 2022 : फिफाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आशिया खंडातील सहा संघ विश्वचषक खेळणार | पुढारी

FIFA WC 2022 : फिफाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आशिया खंडातील सहा संघ विश्वचषक खेळणार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  फुटबॉल विश्वचषक (FIFA WC 2022) स्पर्धेच्या इतिहासात आशिया खंडातील देशांची कामगिरी फारशी उल्लेखनीय राहिलेली नाही. आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत केवळ १३ आशिया खंडातील देश खेळले आहेत. २००२ मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकात दक्षिण कोरियाने उपांत्य फेरी गाठली होती. उत्तर कोरियाने १९६६ साली झालेल्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. विश्वचषकातील आशियाई देशांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

फिफाने विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आशिया खंडातील देशाकडे सोपविण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००२ साली झालेल्या विश्वचषकाचे (FIFA WC 2022) यजमानपद कोरिया आणि जपान या देशांनी संयुक्तपणे भूषवले होते. यजमान म्हणून कतारला प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. कोरिया हा असा आशियाई संघ आहे जो सर्वाधिक १० वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे, या देशाने २००२ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती, तर २०१० साली झालेल्या विश्वचषकात बाद फेरी गाठली होती.

जपान यंदा सातव्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. इराणचा हा सहावा विश्वचषक असून या संघाने आजपर्यंत  बाद फेरीत प्रवेश केलेला नाही. सौदी अरेबियाचा हा सहावा विश्वचषक आहे.

आशिया खंडातील केवळ १३ देश खेळले आहेत फिफा विश्वचषक स्पर्धा

जपान,  इराण, सौदी अरेबिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया हे पाच आशियाई देश आहेत ज्‍यांनी एकापेक्षा अधिकवेळा फिफा विश्वचषक स्‍पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. तर   इंडोनेशिया (१९३८), इस्रायल (१९७०), कुवेत (१९८२), इराक (१९८६), यूएई (१९९०), चीन (२००२) आणि कतार (२०२२) हे विश्वचषक खेळणारे आशिया खंडातील देश आहेत.

हेही वाचा;

Back to top button