रोहित शर्मा सेमीफायनल खेळण्यावरून मोठा खुलासा | पुढारी

रोहित शर्मा सेमीफायनल खेळण्यावरून मोठा खुलासा

अ‍ॅडलेड, वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धचा सेमीफायनल सामना तोंडावर असतानाच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हातावर वेगवान चेंडू आदळला. हिटमॅन रोहित मंगळवारी सकाळी नेटस्मध्ये सराव करत होता. तेव्हा ताशी 150 कि.मी.हून अधिक वेगाने आलेला चेंडू त्याच्या हातावर आदळला. प्रचंड वेदना होऊ लागल्याने रोहित हात धरूनच तेथून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर 40 मिनिटांनी रोहित सरावासाठी पुन्हा आला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले की, रोहीत शर्मा याची दुखापत जास्त गंभीर नसून तो पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी सेमीफायनल होणार असून सलामी फलंदाज व कर्णधार म्हणून या सामन्यात रोहित शर्माची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. रोहितच्या दुखापतीसंदर्भातील माहिती अशी की, नेटस्मध्ये रोहित फलंदाजीचा सराव करत होता. यावेळी थ्रोडाऊन एक्सपर्ट एस. रघू त्याला आर्मरने चेंडू टाकत होता. यावेळी रघू ताशी 150 हून अधिक वेगाने चेंडू टाकत होता, जेणेकरून मार्क वूडसारख्या इंग्लंडच्या गोलंदाजांना सामोरे जाताना कोणतीही समस्या येऊ नये. रघूने असाच एक आर्मरच्या माध्यमातून रोहितला चेंडू फेकला. त्याचा वेग 150 कि.मी.हून जास्त होता. रोहितने हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न फसला आणि चेंडू थेट मनगटाजवळ येऊन आदळला.

हाताला चेंडू लागताच रोहितला प्रचंड वेदना जाणवू लागल्या. यामुळे नेटस्जवळील मेडिकल टीमने तातडीने रोहितच्या दुखापतीची तपासणी केली. त्यानंतर रोहित नेटस्मधून बाहेर पडला. त्यानंतर तो नेटस्च्या बाहेर बसून राहिला. यावेळी तो आपल्या हाताला बर्फाचा शेक देताना दिसत होता. याशिवाय त्याच्या हातावर मोठा आईसबॉल ठेवला गेला होता. यावेळी मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टॉन हे रोहितशी सतत चर्चा करत होते.

सुमारे 40 मिनिटांनी रोहित नेटस्मध्ये परतला. यामुळे त्याची दुखापत गंभीर नसल्याचे संकेत मिळाले. मात्र, यावेळी रोहित बचावात्मक फटके मारताना दिसून आला. दरम्यान, राहुलनेही टाळ्या वाजवून रोहितचा आत्मविश्वास वाढविला. यादरम्यान मेडिकल टीम रोहीत शर्मा याच्या हाताचे निरीक्षण करत होती.

हेही वाचा…

 

Back to top button