AB de Villiers : डिव्हिलियर्सची भविष्यवाणी, ‘हा’ संघ जिंकणार T20 वर्ल्ड कप! | पुढारी

AB de Villiers : डिव्हिलियर्सची भविष्यवाणी, ‘हा’ संघ जिंकणार T20 वर्ल्ड कप!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत (Team India) आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. या सामन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघांची नावे सांगितली आहेत, तर चॅम्पियन बनणाऱ्या संघाचे नावही जाहीर केले आहे.

एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) सध्या भारतात आहे. निवृत्तीनंतर त्याने आयपीएल 2022 मध्ये भाग घेतला नाही, परंतु तो एक मार्गदर्शक म्हणून आयपीएलमध्ये पुनरागमन करू शकतो. दरम्यान, त्याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल, तर टीम इंडिया हा अंतिम सामना जिंकेल, असा विश्वास एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्याने आपले मत सांगितले. तो म्हणाला, मला वाटतं फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने येतील. आणि तो सामना टीम इंडिया जिंकेल. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहली (Virat Kohli) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. भारताचा संपूर्ण संघ खूप प्रतिभावान असल्याचेही त्याने यावेळी म्हटले.

टीम इंडियाने (Team India) यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकले. रोहित ब्रिगेडला फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर टीम इंडियाने आपल्या गटातील गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले. यावेळी अनेक दिग्गज टीम इंडियाला टी 20 विश्वचषक जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार मानत आहेत.

विराट-सूर्यकुमारचा शानदार फॉर्म

एबीडीने सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या खेळीचे कौतुक केले आहे. हे दोघे सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत संघाच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावली आहे, असे त्याने म्हटले. 2022 च्या टी-20 विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या बॅटमधून आल्या आहेत. विराटने 5 सामन्यांत 123.00 च्या सरासरीने 246 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने 5 सामन्यात 75.00 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 193.96 आहे.

Back to top button