पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आयसीसीवर टीका केली आहे. त्याने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. आफ्रिदी म्हणाला, आयसीसी भारताला उपांत्य फेरीत नेण्याचा प्रयत्न करत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर आफ्रिदीने हे वक्तव्य केले आहे. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला होता. (Shahid Afridi on ICC)
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचा संदर्भ देत आफ्रिदीने आयसीसीच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका पाकिस्तानी चॅनलशी संवाद साधताना तो म्हणाला- अॅडलेडचे मैदान किती ओले होते ते तुम्ही पाहिले असेल, असे असतानाही सामना पुन्हा सुरू झाला. आयसीसी भारतीय क्रिकेट संघाला सपोर्ट करत असल्याचं दिसत होतं. भारतीय संघाने कोणत्याही परिस्थितीत उपांत्य फेरी गाठावी, अशी आयसीसीची इच्छा आहे. (Shahid Afridi on ICC)
आफ्रिदी म्हणाला, मला असे वाटते की, आयसीसीचा टीम इंडियाकडे अधिक कल आहे. मात्र आफ्रिदी पाकिस्तानच्या खराब कामगिरीचा राग आयसीसीवर काढत आहे. वास्तविक, पाकिस्तान टी-२० विश्वचषकातून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकाने नेदरलँड्सचा पराभव केला तर पाकिस्तान आणि बांगलादेश थेट विश्वचषकातून बाहेर होतील. या दोघांपैकी एकाचा पराभव झाला तरच पाकिस्तानी संघ स्पर्धेत टीकू शकतो.
अशा स्थितीत शाहिद आफ्रिदीला याचा राग आला असून तो आपल्या संघाच्या कामगिरीचा निषेध करण्याऐवजी दुसऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ कोणत्याही विश्वचषकात टीम इंडियाला पराभूत करू शकला नाही. यापूर्वीही आफ्रिदीने भारताबाबत अशी वक्तव्ये केली आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील शेवटचा सामना ६ नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचा;