AUSvsAFG T20WC : ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय! | पुढारी

AUSvsAFG T20WC : ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUSvsAFG T20WC : टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज (दि. 4) ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर अवघ्या 4 धावांनी निसटता विजय मिळवला. अॅडलेडच्या मैदानावर खेळल्या गेलेला हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाने 20 षटकात 7 बाद 164 धावा केल्या. यात राशिद खानने झुंझार खेळीचे प्रदर्शन केले. त्याने 23 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी 22 धावांची गरज असताना राशिदने एक हाती किल्ला लढवत 16 धावा फटकावल्या. त्याने स्टॉइनिस फेकलेल्या षटकात दोन चौकार एक षटकार खेचून विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात तो यशस्वी झाला नाही.

169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 15 धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर उस्मान घनीला जोश हेझलवूडने तिस-या षटकाच्या तिस-या चेंडूवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर केन रिचर्डसनने सहाव्या षटकाच्या तिस-या चेंडूवर धोकादायक ठरत असलेल्या रहमानउल्ला गुरबाजला वॉर्नर करवी झेलबाद केले. रहमानउल्लाने 2 चौकार, 2 षटकारांच्या सहाय्याने 17 चेंडूत 30 धावा फटकावल्या. त्यावेळी अफगाणिस्तानची धावसंख्या 40 होती. यानंतर गुलबदिन नायीब आणि इब्राहिम झरदान यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी 59 धावांची भागिदारी रचली. पण संघाची धावसंख्या 99 असताना मॅक्सवेलच्या अचून थ्रोवर गुलबदिन नायीब (23 चेंडूत 39 धावा, 3 चौकार-2 षटकार) धावबाद झाला. यानंतर अफगाणिस्तानचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले आणि अफगाणिस्तानला आणखीन दोन झटके दिले. फिरकीपटू झाम्पाने 14 व्या षटकाच्या पहिल्या आणि दुस-या चेंडूवर इब्राहिम झरदान (33 चेंडूत 26 धावा) आणि नजीबुल्ला झरदान (0) यांना आपल्या जाळ्यात अडकवले. इब्राहिमचा झेल मिचेल मार्शने तर नजीबुल्लाचा झेल मॅक्सवेलने पकडला. 99 धावसंख्येवर तीन विकेट्स पडल्याने ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर गेली. पुढच्या म्हणजे 14.3 व्या षटकात हेजलवूडने नबीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यावेळी अफगाणिस्तानची अवस्था धावसंख्या 6 बाद 103 झाले होती.

ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक…

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियन संघाला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. कॅमेरून ग्रीन दोन चेंडूत तीन धावा करून बाद झाला. डेव्हिड वॉर्नर मात्र लयीत दिसत होता. त्याने दुसऱ्या षटकात तीन चौकार मारले. मात्र, सहाव्या षटकाच्या दुस-या चेंडूवर नवीन-उल-हकने त्याला क्लिन बोल्ड करून माघारी धाडले. वॉर्नरने 18 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या स्टीव्ह स्मिथने निराशा केली. तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. पॉवरप्लेच्या 6 षटकांत ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 54 धावा केल्या होत्या. तिस-या क्रमांकावर आलेल्या मिचेल मार्शने एक बाजू सांभाळली धाव फलक हलता ठेवला. तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना मुजीबने 11 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याचा अडसर दूर केला. मार्शचे अर्धशतक 5 धावांनी हुकले आणि तो 45 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार, 2 षटकार लगावले. चार विकेट गामल्यानंतर मॅक्सवेल-स्टॉइनिस जोडीने अफगाणिस्तान गोलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. दोघांनी फटकेबाजी सुरू केली आणि 12 व्या षटकात 14, 13 व्या षटकात 10, 14 व्या षटकात 9, 15 व्या षटकात 12 वसूल केल्या. याचबरोबर दोघांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण करून संघाचा डाव सांभाळला. मात्र, राशिद खानने स्टॉइनिसला बाद करून ही जोडी फोडली. उस्मान घनीने त्याचा झेल पकडला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 139 होती. यानंतर विकेटकीपर बॅट्समन मॅथ्यू वेडने काही विशेष केले नाही आणि तो 6 धावा करून तंबूत परतला. फजलहक फारुकीने त्याला क्लिन बोल्ड करून यजमान संघाला सहावा झटका दिला. 19 वे षटक ऑस्ट्रेलियासाठी खराब गेले. त्यांना या षटकात दोन धक्के बसले. नवीन-उल-हकने या षटकाच्या दुस-या चेंडूवर पॅट कमिन्सला राशिद खान करवी झेलबाद केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर केन रिचर्डसनला धावबाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 8 बाद 159 होती. शेवटचे 20 वे षटक फजलहक फारुकीने फेकले. या षटकाच्या 3 -या चेंडूवर चौकार 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या षटकात त्याने 9 धावा वसूल करून संघाची धावसंख्या 168 पर्यंत पोहचवली. याचबरोबर अफगानिस्तानला विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य दिले.

ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात तीन बदलांसह मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार अॅरॉन फिंच दुखापतीमुळे बाहेर आहे. टीम डेव्हिड आणि मिचेल स्टार्क देखील प्लेईंग इलेव्हनमध्ये नाहीत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी केन रिचर्डसन, कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्ह स्मिथ यांना संघात स्थान देण्यात आले. अफगाणिस्तान संघातही बदल करण्यात आले आहेत. अजमतुल्ला ओमरझाई आणि फरीद अहमद यांच्या जागी दरवेश रसुली आणि नवीन-उल-हक यांचा समावेश करण्यात आला आहे.

अफगाणिस्तान संघ :

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), उस्मान घनी, इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, दरवेश रसुली, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी (कर्णधार), रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी.

ऑस्ट्रेलिया संघ :

कॅमेरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (कर्णधार), पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

Back to top button