गज्या मारणे टोळीतील रूपेश मारणे, संतोष शेलारला 10 नोव्हेंबरपर्यंत मोक्का कोठडी | पुढारी

गज्या मारणे टोळीतील रूपेश मारणे, संतोष शेलारला 10 नोव्हेंबरपर्यंत मोक्का कोठडी

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबियांकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील कुख्यात गुंड रूपेश कृष्णराव मारणे (रा. एकता कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड)आणि संतोष शेलार (रा. कोथरूड) या दोघांना गुन्हे शाखा 2 चे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा मुळशी येथील आंदगाव आणि बोतरवाडी परिसरातून अटक केली. दोघांनाही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार अटक करण्यात आली आहे. दोघांनाही विशेष मोक्का न्यायालयाने 10 नोव्हेंबरपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक झाली असून, नुकतीच यापूर्वी अटक केलेल्या गज्या मारणे आणि त्याच्या साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गजानन उर्फ गज्या उर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (57, रा. कोथरूड, पुणे), मयुर जगदिश जगदाळे (31, रा. आंबेगाव पठार,पुणे), सचिन उर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (43, रा. धनकवडी, पुणे), हेमंत उर्फ आण्णा बालाजी पाटील (39, रा. बुरली, ता. पलुस जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (46, रा. कोडोवली, ता. सातारा, जि. सातारा), फिरोज महमंद शेख (50, रा. मु. पो. नागनवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर), अजय बबन गोळे (28, रा. मानाजीनगर, नर्‍हे, पुणे), मयुर राजेंद्र निवंगुणे (24, रा. नवले ब्रीजजवळ, नर्‍हे), प्रसाद बापू खंडाळे (29, रा. तळजाई वसाहत, लुंकड शाळेजवळ,पदमावती, पुणे) यांची यापूर्वी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यबाबात सध्या सिंहगडरोड परिसरात राहणार्‍या व मुळच्या सांगलीच्या असणार्‍या शेअर मार्केटमधील व्यावसायिकाच्या भावाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा करत होती.

फिर्यादी हे सिंहगड रस्ता परिसरात राहण्यास असून त्यांचा जमीन खरेदी विक्री व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. त्याच माध्यमातून त्यांची हेमंत पाटील याच्याशी ओळख झाली होती. पाटील याने व्यावसायिकाकडे चार कोटी रुपये शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. त्यावरुन त्यांच्यात वाद झाले होते. पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान, पाटील, सचिन घोलप, अमोल किर्दत व यांच्यासह अन्य आरोपींनी शुक्रवारी (दि.7) फिर्यादी व त्यांच्या एका मित्राचे कात्रज येथील आयसीआयसीआय बँकेजवळून अपहरण केले. त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून रात्रभर रावेत, वाकड परिसरामध्ये फिरविले.

तेथे पाटील याने त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना रात्रभर वेगवेगळया गाडीतून फिरवुन, खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मारहाण केली होती. हे प्रकारण उघडकीस आल्यानंतर गज्या मारणे हा फरार झाला होता. त्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सातार्‍यातील एका फार्महाऊवरून वकीलाचा सल्ला घेण्यासाठी आल्यानंतर अटक केली होती. परंतु, गज्याचे साथीदार रूपेश मारणे आणि संतोष शेलार या खंडणीच्या गुन्ह्यात 25 दिवसांपासून फरार होते. त्याच्या मागावर गुन्हे शाखेची पथके होती. गुन्हेशाखेचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर आणि त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक शंकर पाटील, अमंलदार सुधीर इंगळे, राहुल सकट, अमोल वाडकर यांना रूपेश आणि संतोष मुळशी परिसरात असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार पथकाने मुळशी येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेत अटक केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णीक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांना शुक्रवारी दुपारी विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले.

 या कारणासाठी देण्यात आली दोघांना मोक्का कोठडी

20 कोटीसाठी व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर त्याला इनोव्हा गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरविण्यात आले होते. ती इनोव्हा कार जप्त करण्यासाठी

पप्पू घोलप याने संतोष शेलार याच्या मोबाईलवरून संपर्क करून टोळीप्रमुख गजानन मारणे याचे फिर्यादीसोबत बोलणे करून दिले होते. त्यावेळी 20 कोटींची खंडणी मागितली होती.

रूपेश मारणे याने अपहण केलेल्या व्यावसायिकाला त्याच्या घरी शास्त्रीनगर येथे ठेवले होते

फरार कालावधीत आरोपींनी कोठे वास्तव्य केले, त्यांना कोणी आसरा दिला याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील विजय फरगडे यांनी दोघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्याला बचाव पक्षाचे वकील विजय ठोंबरे यांनी विरोध केला. झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने दोघांनाही 10 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गुन्हे शाखेने सापळा रचून अशी केली दोघांना अटक 
रूपेश मारणे व त्याच्या साथीदारांचा गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस शोध घेत असताना रूपेश मारणे हा त्याच्या गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी मुळशी येथील आंदगांव येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच पथक आंदगाव येथे रवाना झाले.

तेथे पथकाने रूपेश मारणे याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे त्याच्या फरार साथीदारांविषयी आणखी माहिती घेतल्यानंतर त्याने त्याचा साथीदार संतोष शेलार हा मुळगावी बोतरवाडी येथे असल्याचे सांगितले. त्यानुसार पथक बोतरवाडी येथे रवाना झाले. तेथे पोहचल्यानंतर संतोष शेलार हा घरातच असल्याचे आढळून आले. त्याला लागलीच ताब्यात घेऊन पथक पुण्यात पोहचले. त्यानंतर दोघांना मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

 रूपेश मारणेचया फरार कालावधीत आणखी मोठा खंडणीचा गुन्हा आला होता समोर
रूपेश मारणे याच्यावर यापूर्वी शहरातील़ विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर शेलार याच्यावरही 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शेअर मार्केट व्यावसायिकाचे 20 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर त्या गुन्ह्यात रूपेश मारणे तब्बल 25 दिवस फरार होता.

दरम्यान, एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेत रूपेश मारणे, उमेश वाफगावकर, अनिल लोळगे, नितीन ननावरे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे रूपेश मारणे याच्या भोवतीचा फास आणखी आवळला गेला. या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिकाने 1 कोटी 85 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यात संबंधीत बांधकाम व्यावसायिकाने तब्बल 2 कोटी 30 लाख देऊनही रूपेश मारणे त्याच्या साथीदारांच्या मदतीने आणखी 65 लाखांच्या खंडणी मागणी करत होता. त्यामुळे त्याच्यावर बेकायदेशिर सावकारी आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button