पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत एकप्रकारे स्त्री-पुरूष समता आणण्याचा प्रयत्न केला आहे. बीसीसीआयने महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्वपूर्ण निर्णयावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली यांनी ट्वीटरच्या माध्यमातून बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. (Ganguly On BCCI'S Decision)
गांगुली ट्वीट करत म्हणाले, आज सकाळी वर्तमानपत्रात बीसीसीआयच्या निर्णयाबाबत वाचले. जय शहा, रॉजर बिन्नी आणि परिषदेतील सर्व सदस्यांचे हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल महत्वाचे आहे. महिला क्रिकेटने खूप मेहनत घेतली आहे, ती त्यांच्या कामगिरीत दिसून येत आहे. (Ganguly On BCCI'S Decision)
नव्या वेतन नियमांनुसार, बीसीसीआय महिला खेळाडूंना पुरूष खेळाडूंएवढेच मानधन देणार आहे. कसोटी क्रिकेटसाठी १५ लाख रूपये, एकदिवसीय क्रिकेटसाठी ६ लाख रूपये, तर टी-२० क्रिकेटसाठी ३ लाख रूपये याप्रमाणे मानधन देणार आहे. यापूर्वी महिला खेळाडूंना एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटसाठी १ लाख रूपये तर कसोटी क्रिकेटसाठी ४ लाख रूपये याप्रमाणे वेतन देण्यात येत होते. (Ganguly On BCCI'S Decision)
यावर्षाच्या सुरूवातीला न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने समान मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. असा निर्णय घेणारा न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड पहिला क्रिकेट बोर्ड ठरला होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डही समान मानधन देण्याच्या निर्णयावर काम करत आहे. भारत समान मानधन देणारा दुसरा देश ठरला आहे. (Ganguly On BCCI'S Decision)