INDvsSA : राहूलला डच्चू की पंत करणार ओपनिंग, काय म्हणाले प्रशिक्षक विक्रम राठोड | पुढारी

INDvsSA : राहूलला डच्चू की पंत करणार ओपनिंग, काय म्हणाले प्रशिक्षक विक्रम राठोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा सलामीवीर लोकेश राहुल हा सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे राहुलला भारतीय संघातून काढून ऋषभ पंतला सलामीला पाठवा, अशी चाहत्यांची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvsSA) तिसर्‍या सामन्यात राहुलला वगळून पंतला संधी देणार का? असा प्रश्न भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना विचारण्यात आला.

विक्रम राठोड म्हणाले की, राहुल हा दर्जेदार खेळाडू असल्याने त्याला वगळणार नाही. केएल राहुलने या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नसली तरी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचे आणि ऋषभ पंतला टॉप ऑर्डरमध्ये समाविष्ट करण्याचे हे एकमेव कारण असू शकत नाही. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला राठोड यांनी ही माहिती दिली. राहूलने सराव सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे.

याबाबत राठोड यांनी सांगितले की, राहुलने सराव सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला जर आता संघातून काढले तर ते एक वाईट उदाहरण सर्वांसमोर येऊ शकते. त्यामुळे आम्ही संघात कोणताच बदल न करण्याचे आतापर्यंत ठरवले आहे, पण या सामन्यात नेमके कोणते बदल होतील, हे खेळपट्टीवर पाहिल्यावर ठरवले जाईल.

दोन्ही साम्यात राहूलची खराब कामगिरी 

राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मागिल दोन्ही सामन्यात राहूलची कामगिरी खराब झाली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चार चेंडूत धाव घेतल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर झालेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात १२ चेंडूंत केवळ नऊ धावा करू शकला.

पंतला रोहित शर्मासोबत सलामीचा जोडीदार म्हणून फलंदाजी करण्याच्या काही संधी मिळाल्या आहेत. त्याने त्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. परंतु राठोड यांनी स्पष्ट केले की, एका चांगल्या क्रिकेटपटूला आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात राहुलला मोठी खेळी करावी लागेल (INDvsSA) 

फलंदाजीत भारताला रोहित शर्मा आणि राहुलकडून एका उत्तम सलामीची अपेक्षा आहे. रोहित शर्माने त्याच्या नैसर्गिक फटकेबाजीला अनुसरून तर राहुलकडून नुसते स्ट्राईक रोटेट न करता रोहित शर्माला पूरक फलंदाजीची अपेक्षा आहे. द. आफ्रिकेचा तिखट जलदगती मारा पाहता रोहित शर्मा आणि राहुलला पहिला पॉवर प्ले खेळून काढणे गरजेचे आहे. कारण आपली सलामी स्वस्तात परतली तर कोहली, सूर्या, दिनेश कार्तिक आणि पंड्या या मधल्या फळीतील कोहली आणि सूर्या यांच्या नैसर्गिक खेळावर बंधने आणून धावा खुंटतील. राहुलला सततच्या दोन अपयशांनी या सामन्यात मोठी खेळी करावीच लागेल; अन्यथा आपल्याला विजयी संघ न बदलायचे तत्त्व बाजूला ठेवून ऋषभ पंतचा सलामीला विचार करावा लागेल.

हेही वाचा…

Back to top button