भारताच्या द. आफ्रिकेविरुद्धच्या (T20 World Cup IND vs SA) सामन्यासाठी मी पर्थला जेव्हा पोहोचलो तेव्हा आकाशात ढगांची गर्दी होती आणि बोचरा वारा स्वागताला हजर होता. गेले दोन दिवस चांगले 25 डिग्री सेल्सियसच्या आसपास असलेला तापमापकाचा पारा काल अचानक 14 डिग्रीवर उतरला. मेलबर्नचा पाऊस ऑस्ट्रेलियातला मधला वाळवंटी प्रदेश ओलांडून पार पर्थपर्यंत पोहोचला की काय असे वाटत होते. आज रविवारीही हवा बर्यापैकी थंडच असणार आहे. पावसाचा अंदाजही आहे, पण तो पाऊस सामन्यावर पाणी फेरेल असा नसल्याने सामन्याला धोका वाटत नाही. या स्पर्धेत पावसाने गुण विभाजणी केल्याने आणि भारताने आपले पहिले दोन्ही सामने जिंकल्याने भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे, पण आजचा सामना जिंकून त्यावर शिक्कामोर्तब करायला भारतीय संघ उत्सुक असेल.
आज आपण द. आफ्रिकेला हरवले तर पाकिस्तानच्या आशेचा दरवाजा किलकिला होईल. अर्थात, त्यांना यासाठी याच मैदानावर सकाळचा नेदरलँड विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल हा भाग वेगळा. द. आफ्रिकेची आतापर्यंत या स्पर्धेतील वाटचाल बघितली तर त्यांच्यावरचा चोकर्सचा शिक्का पुसून काढायच्या निर्धाराने ते खेळत आहेत. या स्पर्धेत न्यूझीलंड आणि द. आफ्रिका या दोनच संघांनी आतापर्यंत फलंदाजी करताना दोनशेचा टप्पा गाठला आहे. रिली रोसोऊ तुफान फॉर्ममध्ये आहे. लागोपाठच्या दोन टी-20 सामन्यांत शतके ठोकायचा पराक्रम त्याने केला आहे. त्याच्याबरोबर डिकॉक, मिलर, मार्कराम आणि कर्णधार बऊमा यांच्यावर द. आफ्रिकेच्या फलंदाजीची मदार असेल. पर्थच्या वेगवान खेळपट्टीचा आणि वार्याचा उपयोग करून घ्यायला रबाडा, नोर्त्जे आणि अनुभवी पार्नेल आहेतच. पर्थला उपयुक्त ठरेल, असा एन्गिडी शम्सीच्या जागी संघात येईल, असे वाटते.
दुसरीकडे आपल्या संघाचा विचार केला तर विजयी संघच कायम ठेवतील असे दिसते. फलंदाजीत भारताला रोहित शर्मा आणि राहुलकडून एका उत्तम सलामीची अपेक्षा आहे. रोहित शर्माने त्याच्या नैसर्गिक फटकेबाजीला अनुसरून तर राहुलकडून नुसते स्ट्राईक रोटेट न करता रोहित शर्माला पूरक फलंदाजीची अपेक्षा आहे. द. आफ्रिकेचा तिखट जलदगती मारा पाहता रोहित शर्मा आणि राहुलला पहिला पॉवर प्ले खेळून काढणे गरजेचे आहे. कारण आपली सलामी स्वस्तात परतली तर कोहली, सूर्या, दिनेश कार्तिक आणि पंड्या या मधल्या फळीतील कोहली आणि सूर्या यांच्या नैसर्गिक खेळावर बंधने आणून धावा खुंटतील.
राहुलला सततच्या दोन अपयशांनी या सामन्यात मोठी खेळी करावीच लागेल; अन्यथा आपल्याला विजयी संघ न बदलायचे तत्त्व बाजूला ठेवून ऋषभ पंतचा सलामीला विचार करावा लागेल. आपल्या मधल्या फळीत अजूनही एक फलंदाज कमी वाटतो. तेव्हा पंतला सलामीला घेऊन राहुलला मधल्या फळीत खेळवायचा विचार केला तर कोहली आणि सूर्यावर आज जितकी भिस्त आहे त्याला थोडा आधार मिळेल. शमी, भुवनेश्वर, अर्शदीप या खेळपट्टीचा फायदा घ्यायला तयार आहेत. आपल्यालाही अश्विन अथवा अक्षर पटेलच्या ऐवजी हर्षल पटेलला खेळवण्याचा विचार करावा लागेल.
सुरुवातीला स्विंगला मदत मिळेल, पण दोन्ही संघांच्या जलदगती गोलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्ध जी फुल लेंग्थ चेंडू टाकत चूक केली ती करता काम नये. पर्थच्या या खेळपट्टीवर स्विंग मिळायला योग्य लेंग्थवर गोलंदाजी केली नाही तर वेगवान गोलंदाजांचा मारा भरकटू शकतो. या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.
खेळपट्टी : पर्थ मैदानावर हा दिवसातील दुसरा सामना असणार आहे. खेळपट्टी हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे वेग, उसळी आणि स्विंग या तिच्या सगळ्या अदा रविवारी दिसणार आहेत. वेगाने बाहेर जाणार्या चेंडूची छेड काढणे फलंदाजांनी टाळले पाहिजे, पण याचबरोबर पर्थचे ग्राऊंड मोठे असल्यामुळे षटकार ठोकणे फलंदाजांसाठी तितके सोपे नसेल.
नाणेफेक : हिरवी खेळपट्टी आणि ढगाळ आकाश, थंड वातावरण याच्या जोडीला पर्थमध्ये अतिशय वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार डोळे झाकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावा या 143 आहेत. एकदाच फक्त इंग्लंडने इथे 200 चा टप्पा गाठला आहे.
हवामान : पर्थचे हवामान ढगाळ असणार आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाज खूश असतील, पण असे असले तरी पावसाची शक्यता अतिशय कमी म्हणजे 14 टक्के इतकी वर्तवली आहे. सायंकाळनंतर तर ती 4 टक्केच असेल. त्यामुळे पाऊस सामन्यात खलनायक बनणार नाही.
4/1
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ टी-20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी 4 सामने भारताने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने एक सामना जिंकला आहे.
दक्षिण आफ्रिका वि. भारत (T20 World Cup IND vs SA)
स्थळ : पर्थ
वेळ : सायं. 4.30 वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् क्रिकेट
निमिष पाटगावकर
हेही वाचा…