Australia Team: ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा धोका! जाणून घ्या गणित | पुढारी

Australia Team: ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा धोका! जाणून घ्या गणित

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत रोमांचक आणि आव्हानात्मक सामने पहायला मिळाले आहेत. दरम्यान, ग्रुप 1 ज्याला ग्रुप ऑफ डेथ देखील म्हटले जात आहे, त्या ग्रुपची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाल्याचे दिसत आहे. अव्वल दोनच्या लढतीसाठी सहा संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. या गटात गतविजेते आणि यजमान ऑस्ट्रेलियाचा (Australia Team) उपांत्य फेरीचा मार्ग आता कठीण होत असल्याचे चित्र आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या विजयामुळे कांगारूंना दिलासा

यजमान ऑस्ट्रेलियाचा (Australia Team) पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने 89 धावांच्या फरकाने एकतर्फी पराभव केला. याचबरोबर दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या इराद्याला मोठा धक्का बसला. मात्र, मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात 21 चेंडू आणि सात गडी राखून मिळवलेल्या विजयाने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती खेळीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने ऑस्ट्रेलियाने पुन्हा उपांत्य फेरीच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. मात्र, यजमानांसाठी आव्हाने कायम आहेत आणि पुढील सर्व सामने त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचा धावगती खराब (Australia Team)

ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे रन रेट. स्पर्धेत पुढे जायचे असेल तर त्यांना उर्वरित सामने केवळ जिंकून चालणार नाही. तर मोठ्या फरकाने विजयाची नोंद करणे आवश्यक असेल. सध्या गुणतालिकेचर नजर टाकल्यास त्यांच्यापेक्षा न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड आणि आयर्लंड हे संघ चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे. आकडेवारीनुसार, न्यूझीलंडचा एका सामन्यात दोन गुणांसह +4.450 चा नेट रन रेट आहे आणि सध्या ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत. तर एक विजय आणि एका पराभवासह श्रीलंका +0.450 रन रेटने दुस-या स्थानी आहे. दरम्यान, डकवर्थ-लुईस नियमानुसार आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागल्या इंग्लंडची अवस्था बरी आहे. ते तिस-या स्थानी आहेत आणि त्यांचा रन रेट +0.239 आहे. चौथ्या स्थानी आयर्लंडचा संघ आहे. त्यांचे गुण दोन झाले असून रन रेट -1.169 आहे. तर सर्वात शेवटी नंबर आहे तो गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा. श्रीलंकेविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवूनही त्यांचा रन रेट -1.555 आहे.

गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील

विशेष म्हणजे, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अशा परिस्थितीत अव्वल स्थानासाठीची लढत प्रामुख्याने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात आहे. आणि यासाठी स्पर्धेतील पुढील सामने सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.

पुढील सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना 28 ऑक्टोबरला (शनिवार) खेळला जाणार आहे. हा सामना दोघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. या सामन्यात ज्या संघाचा पराभव होईल त्याची स्पर्धेतील पुढील वाटचाल खूपच कठीण ठरेल, असे क्रिकेट विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Back to top button