T20 World Cup | ‘रन मशिन’ विराटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा, बनला सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू | पुढारी

T20 World Cup | 'रन मशिन' विराटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा, बनला सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू

मेलबर्न; पुढारी ऑनलाईन : टी२० वर्ल्डकपमधील (T20 World Cup) काल रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ विकेटस् राखून पराभव केला. विराट कोहलीने (Virat Kohli) ५३ चेंडूंत ८२ धावा केल्या. त्याने हार्दिक पंड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत हातातून गेलेला विजय खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी १ धावेची गरज असताना अश्विनने एकेरी धाव घेत सामना संपवला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे विराट कोहलीने दिग्गज भारतीय क्रिकेटर आणि सध्याचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकले आहे आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू बनला आहे.

आता विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सहाव्या स्थानावर आहे. एकूण ५२८ सामन्यांमध्ये त्याने ५३.८० च्या सरासरीने २४,२१२ धावा केल्या आहेत. त्याने ७१ शतके आणि १२६ अर्धशतके झळकली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २५४ एवढी आहे. दरम्यान, सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल द्रविड सातव्या क्रमांकावर गेला आहे. द्रविडने ५०९ सामन्यांत ४५.४१ च्या सरासरीने २४,२०८ धावा केल्या आहेत. ४८ शतके आणि १४६ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. तर द्रविडची सर्वोत्तम धावसंख्या २७० आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ३४,३५७ धावा केल्या आहेत. त्यानंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा (२८,०१६), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२७,४८३), श्रीलंकेचा महेला जयवर्धने (२५,९५७) आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसच्या (२५,५३४) यांचा क्रमांक लागतो.

कालच्या विजयानंतर भारत टी२० वर्ल्डकपच्या (T20 World Cup) ग्रुप २ मध्ये २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी ४ धावा करून माघारी परतले. नसीम शाहने के. एल. राहुलची तर हॅरिस रौफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली. रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरुवात केली. मात्र १० चेंडूंत १५ धावा केल्यानंतर हॅरिस रौफच्या वेगाने त्याला चकवले. अक्षर पटेलला बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र, तो २ धावा करून धावचित झाला. भारताच्या ३१ धावांत ४ विकेटस् पडल्यानंतर हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरुवात केली. त्यांनी नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

१२ व्या षटकात पारडं फिरलं

भारताने ११ व्या ओव्हरपर्यंत ४ विकेटस् गमावून ५४ धावा केल्या होत्या. भारतीय टीमपेक्षा ११ व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तान वरचढ होता. मोहम्मद नवाझच्या १२ व्या षटकामध्ये टीम इंडियाने २० रन केल्या अन् भारतीयांच्या मनात विजयाचे दीप उजळू लागले. हार्दिक पंड्याने पहिल्या बॉलवर षटकार खेचला, यानंतर पंड्याने एक रन घेतली. पुढे चौथ्या बॉलवर विराट कोहलीने षटकार खेचला. सहाव्या चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार खेचला.

१९ वे षटक टाकणार्‍या हॅरिस रौफला सलग दोन षटकार मारत सामना ६ चेंडूंत १६ धावा असा आणला. २० व्या षटकात हार्दिक पंड्या मोहम्मद नवाझच्या पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. पुढे कार्तिकने एक रन काढून विराटकडे स्ट्राईक दिली. विराटने तिसर्‍या चेंडूवर २ धावा केल्या. मोहम्मद नवाझने फुलटॉस बॉल टाकला त्यावर विराटने षटकार खेचला. त्यामुळे टीम इंडियाला ३ बॉलवर ६ धावा हव्या होत्या. यानंतर नवाझने वाईड बॉल टाकला. पुढे विराट कोहलीला फ्री हिटच्या चेंडूवर फटका लगावता आला नाही. यावेळी तीन धावा बाईजच्या मिळाल्या. पुढे कार्तिक स्ट्राईकवर आला आणि तो आऊट झाला. पुढे एका बॉलवर दोन धावा अशी गरज असताना अश्विन स्ट्राईकवर आला. मोहम्मद नवाझने वाईड बॉल टाकला. अखेरच्या बॉलवर अश्विनने एकेरी धाव घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा :

 

Back to top button