Virat Batting Average : विराटच्या अविश्वसनीय खेळीसमोर ‘ब्रॅडमन’ यांचेही बॅटींग ॲव्हरेज पडले फिके! | पुढारी

Virat Batting Average : विराटच्या अविश्वसनीय खेळीसमोर ‘ब्रॅडमन’ यांचेही बॅटींग ॲव्हरेज पडले फिके!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Batting Average : विराट कोहलीने रविवारी (दि. 23) रात्री पाकिस्तानविरुद्धच्या रोमांचक लढतीत झुंझार खेळीचे प्रदर्शन केले. त्याने जबाबदारीने पण तितक्यात आक्रमकतेने 82 धावांची नाबाद खेळी करून अखेरच्या षटकात टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याने पुन्हा एकदा मॅच विनरची महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आणि जगाला आपणच कसे सर्वश्रेष्ठ ‘चेस मास्टर’ आहोत हे त्याने ठणकावून सांगितले.

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीच्या (Virat Batting Average) डावाची सुरुवात अतिशय संथ गतीने झाली, मात्र जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतसा किंग कोहलीनेही आपल्या डावाचा वेग वाढवला. शेवटच्या चेंडूवर संपलेला हा सामना टीम इंडियाने 4 विकेटने जिंकला. सामन्यानंतर विराटने आपल्या खेळीचे वर्णन टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगितले. यापूर्वी, 2016 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 82 धावांची नाबाद खेळी सर्वोत्तम मानली होती.

पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद 82 धावांच्या खेळीच्या जोरावर टी-20 विश्वचषकात विराटची (Virat Batting Average) फलंदाजीची सरासरीही 300 पार गेली आहे. त्याने टी 20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले असून यात केवळ एकदाच त्याला बाद करण्यात यश पाक गोलंदाजाला यश आले आहे. गेल्यावर्षीच्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत शाहीन आफ्रिदीने त्याची विकेट घेतली होती.

विराट कोहलीने 2012 मध्ये टी 20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला. त्यादरम्यान त्याने 78 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानंतर 2014 आणि 2016 मध्ये अनुक्रमे नाबाद 36 आणि नाबाद 55 धावा केल्या. त्याच तर गेल्या वर्षी दुबईमध्ये कोहली 57 धावांची इनिंग खेळून बाद झाला होता. कोहलीने पाकविरुद्धच्या टी 20 विश्वचषकातील 5 सामन्यांमध्ये एकूण 308 धावा केल्या असून त्याची सरासरीही 308 आहे. तर याच संघाविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट 132.75 आहे. पाकिस्तानविरुद्ध कोहलीची फलंदाजीची सरासरी पाहता जगविख्यात फलंदाज दिवंगत डॉन ब्रॅडमन यांचीही सरासरी फिकी पडल्याचे दिसते.

इतकंच नाही तर टी-20 विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्या फलंदाजीची सरासरी 270.50 इतकी आहे. टी-20 विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने 22 डावात एकूण 541 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, T20 विश्वचषकात यशस्वी लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या सरासरीबद्दल बोलायचे झाल्यास, तो 518 आहे.

Back to top button