Virat Kohli King : ‘तो’ एक चेंडू अन् विराटने पाकिस्तानला केले उद्ध्वस्त! | पुढारी

Virat Kohli King : ‘तो’ एक चेंडू अन् विराटने पाकिस्तानला केले उद्ध्वस्त!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आज हाय व्होल्टेज सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर एक लाख प्रेक्षकांच्या समोर खेळला गेलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना न भुतो न भविष्यते असाच झाला. सामन्याचा शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. काही काळासाठी पाकिस्तान संघ जिंकेल असे वाटत होते, पण विराट कोहलीने (Virat Kohli) शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानली नाही, त्याने 53 चेंडूत 82 धावा केल्या. मात्र, एका चेंडूने पाकिस्तानसाठी सामन्याचा निकाल बदलला. तो होता शेवटच्या षटकातील चौथा चेंडू.

अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. हार्दिक पंड्या पहिल्या चेंडूवर बाद झाला, तर दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि तो दुसऱ्या टोकाला गेला. तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने (Virat Kohli) 2 धावा काढल्या, तर चौथ्या चेंडूवर मोहम्मद नवाजने फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वेस्ट हाईटपेक्षा उंच असल्याने पंचांनी तो चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय दिला.

नो बॉल घोषीत करताच पाकिस्तान संघातील खेळाडूंनी पंचांशी बराच वाद घातला. विराट कोहलीने फटका मारल्यानंतर लगेचच त्या चेंडू बाबत तक्रार केली होती. पंचांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) पारड्यात निर्णय देत नो बॉल जाहीर केला. त्यामुळे भारताला अतिरिक्त चेंडू मिळाला. भारताने पहिल्या तीन चेंडूत फक्त 3 धावा घेतल्या होत्या, तर चौथ्या चेंडूवर नो बॉल आणि षटकार मारला. त्यामुळे आता 3 चेंडूत एकूण 6 धावांची गरज होती. पुढचा चेंडू नवाजने वाईड टाकला.

त्यानंतरच्या फेकलेल्या चेंडूवर विराटने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू हुकला आणि विकेटवर आदळून विकेटच्या मागे गेला. पण फ्री हिटवर क्लीन बोल्ड दिले जात नसल्याने याचा फायदा घेत डीके आणि विराटने तीन धावा काढल्या. आता पुढच्या दोन चेंडूत दोन धावा हव्या होत्या. पुढच्या चेंडूवर दिनेश कार्तिक स्टंप आऊट झाला. त्यानंतर आर अश्विन मैदानात उतरला. नवाजने पहिला चेंडू अश्विनकडे वाइड फेकला आणि पुढच्याच चेंडूवर अश्विनने चौकार मारला. याचबरोबर भारताने रोमहर्षक विजय मिळवून भारतीयांना एक दिवाळी गिफ्ट दिले.

Back to top button