ENG vs AFG : इंग्लंडची विजयी सलामी; सॅम करणने केला 'हा' विक्रम | पुढारी

ENG vs AFG : इंग्लंडची विजयी सलामी; सॅम करणने केला 'हा' विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपर- १२ फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानवर पाच गडी राखून मात केली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव १९.४ षटकांत ११२ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडने १८.१ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा संघ टी-२० मध्ये तीनदा आमनेसामने आला आहे. यातील तिन्ही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. हे तिन्ही सामने फक्त टी-२० विश्वचषकात खेळले गेले आहेत. (ENG vs AFG)

इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टनने २९ धावा केल्या. कर्णधार जोस बटलर आणि डेव्हिड मलान १८ धावांवर बाद झाले. त्याचवेळी अॅलेक्स हेल्स १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बेन स्टोक्स दोन आणि हॅरी ब्रूकने सात धावा करून बाद झाले. मोईन अली आठ धावांवर नाबाद राहिला. अझमतुल्ला ओमरझाई वगळता अफगाणिस्तानच्या सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (ENG vs AFG)

अफगाणिस्तानची फलंदाजी फ्लॉप

अफगाणिस्तानच्या संघाला ११ धावांवर पहिला धक्का बसला. मार्क वुडने रहमानउल्ला गुरबाजला यष्टिरक्षक बटलरच्या हाती झेलबाद केले. गुरबाजला १० धावा करता आल्या. बेन स्टोक्सने हजरतुल्ला झझाईला लियाम लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद करत अफगानिस्तानला दुसरा धक्का दिला. त्याने १७ चेंडूत ७ धावा केल्या. ६२ धावांवर अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. सॅम करणने इब्राहिम झद्रानला मोईन अलीकडे झेलबाद केले. त्याने ३२ चेंडूत ३२ धावा केल्या.

अफगाणिस्तानला ८२ धावांवर चौथा धक्का बसला. नजीबुल्ला झद्रानला स्टोक्सने १३ धावांवर बाद केले. यानंतर अफगाणिस्तानला ९१ धावांवर पाचवा धक्का बसला. मार्क वुडने कर्णधार मोहम्मद नबीला यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेलबाद केले. विकेटच्या मागे उडी मारत बटलरने शानदार झेल घेतला. नबी तीन धावा करून बाद झाला.

यानंतर अजमतुल्ला आठ धावा करून बाद झाला. राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांना तर या सामन्यात खातेही उघडता आले नाही. सॅम कुरनने फझलहक फारुकीला बाद करत अफगाणिस्तानचा डाव १९.४ षटकांत ११२ धावांत आटोपला. करणने ३.४ षटकात १० धावा देत पाच बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पाच बळी घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. याशिवाय बेन स्टोक्स आणि मार्क वुडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली.

हेही वाचा;

Back to top button