Team India : टीम इंडियामध्ये 3 गोलंदाज फिक्स, जाणून घ्या कुणाची होणार सुट्टी! | पुढारी

Team India : टीम इंडियामध्ये 3 गोलंदाज फिक्स, जाणून घ्या कुणाची होणार सुट्टी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Playing XI T 20 World Cup 2022 : टीम इंडिया 23 ऑक्टोबरला पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. हा ‘हाय व्होल्टेज’ सामना कधी सुरू याची उत्सुकता चाहत्यांसह क्रिकेट तज्ज्ञांना लागली आहे. भारतात दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. पण पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल हा मोठा प्रश्न आहे. जगभरातील क्रिकेट दिग्गजही याबाबत आपली मते मांडत आहेत. यातच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडीने भारतीय संघाबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. त्याने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणत्या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश असेल त्यांची नावे जाहीर केली आहेत. मूडीने जी नावे घेतली आहेत त्याबाबत मतमतांरे असतील. कारण प्रत्येकाची निवड वेगळी असते. परंतु मूडीने आपल्या बाजूने सर्वोत्तम गोलंदाज निवडले आहेत.

टॉम मूडीकडून तीन वेगवान गोलंदाजांची निवड

भारताच्या (Team India) वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश असू शकतो, असे टॉम मूडीचे मत आहे. विशेष बाब म्हणजे भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग भारतासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टी-20 क्रिकेट खेळत आहेत. मात्र, मोहम्मद शमी जवळपास वर्षभर तरी भारतीय संघाकडून टी-20 सामने खेळलेला नाही. टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय चमूत तो स्टँडबाय खेळाडू होता. पण जसप्रीत बुमराह आणि दीपक चहर हे दोन गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर पडल्याने त्याचा 15 च्या संघात समावेश करण्यात आला. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात खेळवण्यात आले. त्या सामन्यात शमीने चमकदार केली. कर्णधार रोहित शर्माने शमीला शेवटचे षटक दिले. अखेरच्या षटकात 11 धावा वाचवण्याची जबाबदारी शमीकडे देण्यात आली आणि त्याने त्या षटकात तीन बळी घेत खळबळ उडवून दिली. त्याच षटकात एक खेळाडूही धावबाद झाला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट पडल्या आणि टीम इंडियाने सामना जिंकला.

मोहम्मद शमीचा समावेश का करण्यात आला? (Team India)

टॉम मूडीच्या मते मोहम्मद शमीचा अनुभव पाहता त्याला संघात प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देणे आवश्यक आहे. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप हे दोन गोलंदाजांनाही स्थान द्यावे. त्यांची साथ शमीला मिळेल, असेही ते म्हणाले. सराव सामन्यात शमीने केलेली गोलंदाजी पाहता त्याने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजीबद्दल बोलताना टॉम मूडी म्हणाले की, टीम इंडियाला पहिली सहा षटके थोडी काळजी घेऊन खेळावे लागतील, एकदा भारतीय फलंदाज स्थिरावला की टीम इंडियासाठी सामना सोपा होईल.

Back to top button