T20 World Cup : टीम इंडियाच्या गटात ‘या’ दोन संघांची एन्ट्री | पुढारी

T20 World Cup : टीम इंडियाच्या गटात ‘या’ दोन संघांची एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीसाठी सर्व संघ निश्चित झाले आहेत. या फेरीत एन्ट्री घेणारा झिम्बाब्वे हा शेवटचा संघ ठरका आहे. क्रेग इर्विनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेने होबार्ट येथे झालेल्या सामन्यात स्कॉटलंडचा पाच गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेपूर्वी श्रीलंका, नेदरलँड आणि आयर्लंडनेही पात्रता फेरीत विजय मिळवून सुपर-12 साठी आपली जागा पक्की केली. या चार संघांपैकी झिम्बाब्वे आणि नेदरलँड या संघांना भारताच्या ग्रुपमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर श्रीलंका आणि स्कॉटलंड या संघांना ग्रुप 1 मध्ये स्थान मिळाले आहे.

क्वालिफाइंग राउंड 1 च्या ब गटात झिम्बाब्वे प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे त्याला भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश या संघांचा समावेश असलेल्या सुपर-12 टप्प्यातील गट-2 मध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणारा भारत विरुद्ध झिम्बाब्वेचा सामना निश्चित झाला आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी रोहित ब्रिगेड नेदरलँड विरुद्ध खेळणार आहे.

सुपर-12

ग्रुप 1 : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, स्कॉटलंड
ग्रुप 2 : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड, झिम्बाब्वे

टी 20 विश्वचषक स्पर्धा क्वालिफाइंग राउंड 1, सुपर-12 आणि प्लेऑफ अशा एकूण तीन टप्प्यात खेळवली जात आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 16 पैकी 8 संघ थेट सुपर -12 साठी पात्र ठरले आहेत, तर उर्वरित 4 संघ श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड आणि स्कॉटलंड हे क्वालिफाइंग राउंड जिंकून सुपर-12 साठी पात्र ठरले आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान

विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय संघ या विश्वचषकात उतरणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर 27 ऑक्टोबरला नेदरलँड, 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका आणि 2 नोव्हेंबरला बांगलादेशशी रोहित ब्रिगेडचा सामना होईल. त्यानंतर शेवटचा सामना 6 नोव्हेंबरला ग्रुप-बीच्या विजेत्या संघाशी होईल.

टी 20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सामने (भारतीय वेळेनुसार) :

23 ऑक्टोबर : विरुद्ध पाकिस्तान : दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न
27 ऑक्टोबर : विरुद्ध नेदरलँड्स : सिडनी दुपारी 12.30 वाजता
30 ऑक्टोबर : विरुद्ध दक्षिण आफ्रिका : संध्याकाळी 4.30, पर्थ
2 नोव्हेंबर : विरुद्ध बांगलादेश : दुपारी 1.30 वाजता, अॅडलेड
6 नोव्हेंबर : विरुद्ध झिम्बाब्वे : दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न

असा झाला झिम्बाब्वे-स्कॉटलंडचा सामना

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने सहा गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा केल्या. जॉर्ज मुनसेने सर्वाधिक 54 आणि कॅलम मॅक्लिओडने 25 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून तेंडाई चतारा आणि नागरवा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 18.3 षटकांत 5 विकेट गमावत 133 धावा करून सामना जिंकला. क्रेग इर्विन 58 आणि सिकंदर रझा यांनी 40 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.

Back to top button