Prithvi Shaw Century : ‘पृथ्वी क्षेपणास्त्र’ सुसाट; आसाम विरुद्ध ४६ चेंडूंत झळकावले शतक | पुढारी

Prithvi Shaw Century : ‘पृथ्वी क्षेपणास्त्र’ सुसाट; आसाम विरुद्ध ४६ चेंडूंत झळकावले शतक

राजकोट; वृत्तसंस्था : देशांतर्गत सुरू असणार्‍या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेचा 2022-23 च्या हंगामात मुंबईकडून फलंदाजी करताना चौफेर फटकेबाजी केली. स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीतील ‘अ’ गटात मुंबई आणि आसाम यांच्यात सामना झाला. त्यात त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याने (Prithvi Shaw Century) अवघ्या 46 चेंडूंत शतक झळकावले. त्याच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर मुंबईने 61 धावांनी विजय मिळवला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वीने (Prithvi Shaw Century) या सामन्यात 19 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आसामच्या गोलंदाजांचे वाभाडे काढले. राजकोट येथे झालेल्या या सामन्यात मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. सलामीवीर पृथ्वी शॉने आपला दमदार फॉर्म कायम राखत झंझावाती शतक झळकावले. आसामविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने अवघ्या 3 गडी गमावून 230 धावा केल्या. यादरम्यान पृथ्वीने सलामीवीर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 61 चेंडूंत 13 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 134 धावा केल्या. या सामन्यात पृथ्वी शॉने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर आसामच्या गोलंदाजांना घाम फुटला.

पृथ्वीने पहिल्या षटकात सलग 5 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. पाचव्या षटकात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. या षटकात त्याला 26 धावा मिळाल्या. पृथ्वीसोबतच यशस्वी जैस्वालनेही चांगली कामगिरी केली. त्याने 30 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. सर्फराज खान 15 धावांवर नाबाद राहिला. तर शिवम दुबेने छोटी आणि दमदार खेळी खेळली. शिवमने 7 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 17 धावा केल्या.

कर्णधार मृण्मय दत्ता आसामसाठी सर्वात महागडा ठरला. त्याने 2 षटकांत 41 धावा दिल्या. रोशन आलमने 4 षटकांत 41 धावा देत एक गडी बाद केला. रियान आणि अहमदने 1-1 बळी घेतला. प्रत्युत्तरात आसाम संघाला 19.3 षटकांत सर्वबाद 169 धावा करता आल्या. रज्जाकुद्दिन अहमद याने सर्वाधिक 39 धावा केल्या. मुंबईकडून तुषार देशपांडेने 25 धावांत 3 विकेटस् घेतल्या.

हे ही वाचले का?

Back to top button