Crisis on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता, महामुकाबल्यावर संकटाचे ढग | पुढारी

Crisis on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता, महामुकाबल्यावर संकटाचे ढग

पुढारी ऑनलाईन डेस्क : Crisis on India-Pakistan Match in T20 World Cup : टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत. यंदाची ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. या जागतिक स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवल्या जाणा-या या महामुकाबल्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. पण या सामन्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यामुळे कदाचीत हा सामनाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता…

विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. पण 23 ऑक्टोबरला मेलबर्नमधील पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मेलबर्नमध्ये 20 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग होऊ शकतो. हवामान अंदाजानुसार, 23 ऑक्टोबर रोजी पावसाची 60 टक्के शक्यता आहे. त्याचवेळी किमान तापमान 12 अंशांवर तर कमाल तापमान 19 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोट्यवधी चाहत्यांना बसू शकतो धक्का…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. यातील साखळी सामना भारताने आणि सुपर फोर फेरीतील सामना पाकिस्तानने जिंकला. गेल्या वर्षी टी 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय चाहते वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत हवामानातील बदलामुळे कोट्यवधी चाहत्यांना धक्का बसू शकतो. गेल्या विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता.

टी 20 मध्ये हेड टू हेड आकडे कसे आहेत…

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 8 सामने भारताने जिंकले आहेत. तर 3 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. मात्र, टी 20 मध्ये भारताचा वरचष्मा आहे. पण गेल्या विश्वचषकातील पराभवामुळे टीम इंडिया पाकिस्तान संघाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.

Back to top button