T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर अपेक्षांचा दबाव | पुढारी

T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर अपेक्षांचा दबाव

आयसीसीची कोणतीही स्पर्धा असू दे, त्यात ज्या संघांना विजयाचे दावेदार मानले जाते, त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ असतोच. मोठ्या स्पर्धा कशा जिंकायच्या हे या संघाला चांगलेच अंगवळणी पडले आहे. यामुळेच या संघाकडे वन-डेमधील पाच वर्ल्डकप, एक टी-20 चा वर्ल्डकप आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफीचे अजिंक्यपद आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) ऑस्ट्रेलिया आपल्या अंगणात खेळत आहे, स्पर्धेचे ते गतविजेते आहेत, त्यामुळे साहजिकच विजयाचे ते दुप्पट प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण याच अपेक्षा त्यांना घातक ठरू शकतात. मायदेशात स्वत:च्या दर्शकांपुढे खेळताना विश्वविजेतेपद कायम राखण्याचा त्यांच्यावर दबाव आहे.

अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील संघाची अगदी अलीकडील कामगिरी फारशी चांगली नाही. भारतात त्यांनी पहिला टी-20 सामना जिंकला, पण नंतर मालिका गमावली. वेस्ट इंडिजला मायदेशात मात दिली; परंतु इंग्लंडविरुद्ध त्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. या वर्ल्डकपमध्ये ते 22 ऑक्टोबरला उद्घाटनाच्या सामन्यात खेळणार आहेत.

संघातील प्रत्येक खेळाडू हा मॅचविनर आहे, हीच ऑस्ट्रेलियाची ताकद आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या ताकदीवर सामना फिरवू शकतो. फलंदाजीत त्यांच्याकडे डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांसारखे खेळाडू आहेत. गोलंदाजीत मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांच्यासोबत अ‍ॅडम झम्पा आहे. मार्कस स्टॉईनिस आणि मिशेल मार्श हे अष्टपैलू खेळाडू आहेत. गरज वाटल्यास मॅक्सवेलही गोलंदाजी करू शकतो.

पण संघाचे कॉम्बिनेशन कसे असावे याबाबत त्यांच्याकडे अजूनही अनिश्चितता आहे. टीम डेव्हिड संघात आल्यामुळे स्टीव्ह स्मिथ प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागत आहे. नवोदित टीम डेव्हिडने आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वीच मोठे नाव कमावले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्याच्याकडून चांगल्या अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाची टी-20 वर्ल्डकपमधील कामगिरी (T20 World Cup) : 2007 : सेमीफायनल, 2009 : राऊंड-1, 2010 : उपविजेता, 2012 : सेमीफायनल, 2014 : राऊंड-2, 2016 : राऊंड-2, 2021 : विजेता.

हेही वाचा..

Back to top button