T20 World Cup : टीम इंडियामध्ये ‘या’ 7 खेळाडूंचे स्थान पक्के, जाणून घ्या.. | पुढारी

T20 World Cup : टीम इंडियामध्ये ‘या’ 7 खेळाडूंचे स्थान पक्के, जाणून घ्या..

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात असून टी-20 वर्ल्ड कपची जय्यत तयारी करत आहे. भारतीय संघाने आपल्या तयारीच्या संदर्भात पहिला सराव सामनाही खेळला आणि विजयही मिळवला आहे. भारताला अजून तीन सराव सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये शेवटचे दोन सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध दोन हात करायचे आहेत. भारतीय संघ टी 20 विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रोहित ब्रिगेडचा आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी महामुकाबला होणार आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल याच्या चर्चा रंगल्या आहेत. भारताची प्लेइंग इलेव्हन कोणतीही असो, पण संघातील सात खेळाडूंचे स्थान निश्चित झाल्याचे जवळपास निश्चित दिसते. हे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसतील यात शंका नसल्याचे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

रोहित शर्मा आणि केएल राहुल टीम इंडियासाठी ओपनिंग करतील

भारतीय संघाने खेळलेल्या सराव सामन्यात केएल राहुल नव्हता. त्यामुळे ऋषभ पंत सलामीला आला होता. पण टी 20 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल हेच सलामीला येतील हे निश्चित आहे. यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येईल. तसेच सूर्यकुमार यादवचा चौथा क्रमांक निश्चित आहे. विराट आणि सूर्य कुमार यांनी गेल्या काही सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यांचा तोच फॉर्म विश्वचषक स्पर्धेतही कायम राहिला, तर विरोधी संघांसाठी मोठी अडचणीचे ठरेल. पाचव्या क्रमांकाबद्दल बोलायचे झाल्यास या स्थानासाठी हार्दिक पंड्याचे नाव पुढे येते. तो केवळ बॅटनेच नाही तर चेंडूनेही अप्रतिम कामगिरी करण्यास सज्ज आहे. यानंतर दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर येईल, जो सातत्याने फिनिशरची भूमिका जबाबदारीने पार पाडत आहे. सातव्या क्रमांकासाठी अक्षर पटेलचे नाव फिक्स आहे. कारण रवींद्र जडेजा दुखापतीने संघात नाही. मात्र, अक्षरने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यात तो पटाईत आहे. त्यामुळे त्याची संघातील स्थान पक्के असेल असे जाणकरांना वाटते. अशाप्रकारे सातव्या क्रमांकापर्यंतच्या फलंदाजांपैकी दोन खेळाडू असे आहेत जे गोलंदाजी करू शकतात आणि पूर्ण चार षटके टाकू शकतात. (T20 World Cup)

दुसरीकडे, एखाद्या खेळाडूला दुखापत झाली किंवा आणखी काही कारण असेल तरच संघात बदल केला जाईल. बाकीचा संघ असाच राहील. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांना संधी मिळेल, पण टीम इंडियाची पहिली पसंती दिनेश कार्तिकला असेल हेही दिसून येत आहे. (T20 World Cup)

जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर झाल्यानंतर ठरणार बॉलिंग लाइनअप

जर गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्यात काही बदल पाहायला मिळणार आहेत. बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा अद्याप झालेली नाही, त्यामुळे भारतीय संघाची ‘पेस बॅटरी’ कशी असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. मात्र रिप्लेसमेंटची घोषणा होताच गोलंदाजी कशी असेल हे स्पष्ट होईल. पण अर्शदीप सिंगला प्रत्येक सामन्यात संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे, कारण तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि तो भारतीय संघासाठी मॅच विनरही ठरू शकतो. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर सामन्यानुसार त्यात बदल होताना दिसतात. रविचंद्रन अश्विन खेळणार की युझवेंद्र चहल? भुवनेश्वर कुमार खेळेल की अन्य कोणता गोलंदाज? पण सातव्या क्रमांकापर्यंत संभावित संघ फिक्स असेल असे काही जाणकरांचे मत आहे. उर्वरित चार खेळाडूंमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. पुढील तीन सराव सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो आणि त्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Back to top button