Ishan Kishan 2ND ODI: शतक कसे हुकले? ईशान किशन म्हणाला, "मी कधीच स्वत:साठी ..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रेयस अय्यरने केलेली शतकीपारी आणि इशान किशनने केलेल्या ९३ धावांच्या जोरावर भारताने आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेतील दुसरा सामना सहज जिंकला. (Ishan Kishan 2ND ODI) या सामन्यानंतर माध्यमाशी बोलताना ईशान किशन याने आपल्या दमदार फलंदाजी आणि शतक कसे हुकले यावर आपलं मत व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना ११ षटकांत दोन बाद ५५ धावा अशी भारतीय संघाची अवस्था होती. यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशन फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले. या दोघांनीही उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. आपल्या खेळीबाबत माध्यमांशी बोलताना २४ वर्षीय ईशान किशन म्हणाला की, “काही खेळाडूंमध्ये स्ट्राईक रोटेट करण्याची ताकद आहे, माझी ताकद षटकार मारणे आहे. मी सहजतेने षटकार मारतो आणि बरेच जण असे करू शकत नाहीत. जर मी षटकार मारून काम केले तर स्ट्राइक रोटेट करण्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही.”
Ishan Kishan 2ND ODI : मी कधीही स्वत:साठी खेळत नाही
“साहजिकच बॅटिंग करता स्ट्राईक रोटेट करणे खूप महत्त्वाचो आहे. मी एकेरी खेळू शकलो असतो आणि शतकापर्यंत मजल मारता आली असती; पण मी कधीही अशा झोनमध्ये जात नाही जिथे मी केवळ स्वतःचा विचार करुन खेळतो. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मी वैयक्तिक धावसंख्येचा विचार केल्यास माझे चाहते निराश होतील.”, असेही ईशानने स्पष्ट केले.
आयपीएल २०२२मध्ये खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा ईशाान किशन ९९ धावांवर बाद झाला होता. अशाच खेळीची रविवारी पुनरावृत्ती झाली. याबाबत त्याला विचारले असता ईशान म्हणाला, “त्या सामन्यात आम्हाला दोन चेंडूत पाच धावा हव्या होत्या. मी 99 धावांवर आऊट झालो. जर मी स्ट्राईक रोटेट करण्याचा विचार केला तर जिंकणे कठीण झाले असते.”
शतक हुकणे हे निराशाजनक;पण संघासाठी दिले मोठे योगदान
“साहजिकच शतक चुकणे निराशाजनक आहे; पण मला वाटते की संघासाठी 93 धावांचे योगदान हे मोठे आहे. संघाला गती देणे आणि संघाला झोनमध्ये ठेवणे खूप महत्त्वाचो होते. जेणेकरून पुढील फलंदाजांवर कमी दबाव असेल,” असे ईशानने सांगितले.
विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी तुम्ही संघाचा भाग नसताना वाईट वाटते, अशी खंत व्यक्त करत माझ्यात काही उणीवा असतील त्यामुळे संघ निवडकर्त्यांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी माझा विचार केला नसेल. त्यामुळे मी स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही तो म्हणाला.
A memorable night, in front of my home crowd made it all the more special 🤗❤️🇮🇳 pic.twitter.com/PojMo2GiRy
— Ishan Kishan (@ishankishan51) October 9, 2022
हेही वाचा :
- Legends League Cricket : मैदानातच दोन दिग्गज क्रिकेटपटूमध्ये ‘राडा’ , जॉन्सनने दिला युसूफ पठाणला धक्का (पाहा व्हिडीओ )
- Cricket T-20 : असं फक्त क्रिकेटमध्येच घडू शकतं, ३० धावात संघ गुंडाळला आणि…..
- cricket laws : क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल, १ ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी