Jasprit Bumrah : बुमराहचे टीकाकारांना प्रत्युत्तर; म्हणाला, ‘भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड माराल तर..’ | पुढारी

Jasprit Bumrah : बुमराहचे टीकाकारांना प्रत्युत्तर; म्हणाला, ‘भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड माराल तर..’

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. कर्णधार रोहित शर्मासह एकूण १४ खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील सदस्यांनी ऑस्ट्रेलियाचे विमान पकडले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील संघाचा एक भाग होता, परंतु बीसीसीआयने मंगळवारी पुष्टी करत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी विश्वचषकातून बाहेर पडला असल्याचे जाहीर केले. मात्र, त्याच्या जागी नव्या खेळाडूची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. संघ ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल असे समजते आहे.

दुखापतीमुळे बुमराह (Jasprit Bumrah) यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमधूनही बाहेर पडला होता. त्यानंतर एनसीएमध्ये उपचार व ट्रेनिंग सेशन पूर्ण करून तो संघात परतला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी 20 मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले होते, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा आणि तिसरा सामना खेळल्यानंतर तो जखमी झाला होता.

द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून बाहेर पडल्यानंतर, बीसीसीआयने पुढील सामन्यापूर्वीच बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असल्याचे जाहीर केले. बुमराहच्या दुखापतीची बातमी ऐकून चाहत्यांनी आणि समीक्षकांनी बुमराहवर जोरदार निशाणा साधला. चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करत बुमराह नेहमीच आयपीएलमधील फ्रँचायझीसाठी उपलब्ध असतो परंतु देशाच्या संघाकडून खेळण्याची वेळ येते तेव्हा तो जखमी होतो, अशी टीका केली.

याशिवाय, काही टीकाकारांनी बुमराहची तुलना मिचेल स्टार्कशी केली आहे. ‘स्टार्क आणि बुमराह या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी जवळपास सारखेच सामने खेळले आहेत, परंतु स्टार्क टी-20 लीग खेळत नाही आणि ऑस्ट्रेलियासाठी जास्त सामने खेळतो, तर बुमराह आयपीएलमध्ये मुंबईसाठी प्रत्येक सामना खेळतो’, असे म्हटले आहे.

यावर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात लिहिलंय की, ‘तुम्ही थांबून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड माराल तर तुम्ही तुमच्या जागेवर पोहोचू शकणार नाही’, असा टोला लगावला आहे. वास्तविक, हे विधान ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी केले होते. या पोस्टद्वारे बुमराहने अशा लोकांवर निशाणा साधला आहे जे त्याच्या क्रिकेट आणि टीम इंडियाच्या समर्पणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

टी-२० विश्वचषक संघातून बाहेर पडल्याने बुमराह दुःखी

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या संघातून बाहेर पडल्यानंतर बुमराहने ट्विट करून आपले दुःख व्यक्त केले. त्याने लिहिले की, ‘यावेळेस मी टी-२० विश्वचषकाचा भाग असणार नाही याचे मला दु:ख आहे, पण माझ्या प्रियजनांकडून मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी बरा होताच मी या स्पर्धेत सहभागी होईन. संपूर्ण स्पर्धेसाठी मी यावेळी माझ्या संघाला पाठिंबा देईन.’

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

 

Back to top button