Mohammad Shami : मोहम्मद शमीचा जीव धोक्यात, कट्टरवाद्यांनी दिली जीवे मारण्याची धमकी! | पुढारी

Mohammad Shami : मोहम्मद शमीचा जीव धोक्यात, कट्टरवाद्यांनी दिली जीवे मारण्याची धमकी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शमी सध्या संघाचा भाग नाही. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी त्याची निवड झाली पण कोरोना संसर्गामुळे त्याला बाहेर पडावे लागले. आता तो बरा झाला आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. बुमराह दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे, दरम्यान, त्याच्या जागी शमीचा समावेश केला जाऊ शकतो. सध्या शमी एका ट्विटर पोस्टमुळे कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे. ट्विटरवर शमीने विजयादशमी निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने प्रभू श्री राम यांचे छायाचित्रही पोस्ट केले आहे. परिंणामी ही बाब कट्टरवाद्यांना आवडली नाही आणि त्यांनी शमीला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली आहे.

मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सोशल मीडियावर दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे तो कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला. सोशल मीडियावरच, काही युझर्सनी त्याच्या ट्विटला धर्माशी जोडून त्याला ट्रोल केले. एवढेच नाही तर शमीने त्याचे नाव बदलावे असा सल्लाही काहींनी दिला. मात्र, शमीने या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केले आहे. शमीच्या या ट्विटला आतापर्यंत 43 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक तर अडीच हजाराहून अधिक युजर्सनी त्याचे ट्विट रिट्विट केले आहे. दरम्यान, अनेक लोकांनी शमीला पाठिंबा सुद्धा दिला आहे.

ट्विटमध्ये प्रभू श्री राम यांचा फोटो पोस्ट

शमीने (Mohammad Shami) आपल्या ट्विटमध्ये प्रभू श्री राम यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘दसर्‍याच्या या पवित्र सणाच्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळो ही माझी भगवान रामाकडे प्रार्थना आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. या ट्विटवरून काही युजर्सनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. एका युजरने तर त्याच्या विरोधात फतवा काढला जाऊ शकतो असेही लिहिले.

शमीला टी 20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळेल का? (Mohammad Shami)

शमीने आतापर्यंत 60 कसोटी, 82 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शमीच्या पोस्टवरून गदारोळ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही युजर्सनी त्याला अनेकदा टार्गेट केले आहे. मैदानावरही तो जेव्हा चूक करतो तेव्हा धर्माच्या नावाखाली चाहते त्याला लक्ष्य करतात. खुद्द त्याची पत्नी हसीन जहाँने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर अनेकदा निशाणा साधत अनेक आरोप केले आहेत. यावेळी शमीला टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बुमराहच्या जागी बीसीसीआयकडून लवकरच नव्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली जाईल.

बांगलादेशच्या क्रिकेटपटूलाही दिली होती धमकी…

2020 मध्ये बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शकीब अल हसन याला अतिरेक्यांनी धमकी दिली होती. बांगलादेशच्या या खेळाडूने कोलकाता येथील काली पूजेला हजेरी लावली होती, त्यानंतर सिलेटच्या एका व्यक्तीने व्हिडिओ बनवला आणि शकीब अल हसनला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर साकिबने माफीही मागितली होती.

Back to top button