Rahkeem Cornwall : 22 षटकार, 17 चौकार… विंडीजच्या ‘या’ फलंदाजाने ठोकले T20 मध्ये द्विशतक | पुढारी

Rahkeem Cornwall : 22 षटकार, 17 चौकार... विंडीजच्या ‘या’ फलंदाजाने ठोकले T20 मध्ये द्विशतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : फलंदाजाची जेव्हा बॅट तळपते तेव्हा केवळ चौकार-षटकारांचा पाऊस पडत नाही, तर धावांचा डोंगरही रचला जातो. सध्या टी-20 क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज वादळी खेळी करून मोठ-मोठ्या विक्रमांना गवसणी घालताना आपल्याला पहायला मिळतात. मात्र विंडीज क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रहकिम कॉर्नवॉल (Rahkeem Cornwall) याने खेळलेल्या खेळीने सध्या सर्वांचीच मनं जिंकली आहेत. कॉर्नवॉल सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या अटलांटा ओपन टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. बुधवारी अटलांटा फायरकडून खेळताना त्याने स्क्वेअर ड्राइव्हविरुद्ध झंझावाती द्विशतक झळकावले.

22 षटकार, 17 चौकार…

6 फूट 5 इंच उंच असलेल्या या कॅरेबियन फलंदाजाने शानदार कामगिरी केली. त्याने 77 चेंडूत 205 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 22 षटकार आणि 17 चौकार ठोकत यातूनच त्याने 200 धावा वसूल केल्या. अशा प्रकारे त्याने 266.23 च्या स्ट्राईक रेटने नाबाद द्विशतक (205*) झळकावल्या. कॉर्नवॉलने (Rahkeem Cornwall) डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले. यापूर्वी त्याने 43 चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्याच्या खेळीच्या जोरावर अटलांटा फायर प्रतिस्पर्धी संघासमोर निर्धारित 20 षटकांत 1 गडी गमावून 326 धावांचा डोंगर उभा केला.

कॉर्नवॉल व्यतिरिक्त, स्टीव्हन टेलरने 294.44 च्या स्ट्राइक रेटने 18 चेंडूत 53 धावा फटकावल्या. ज्यात 5 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या समी अस्लमने 29 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह अर्धशतक (53) पूर्ण केले. 326 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना स्क्वेअर ड्राईव्हचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावून 154 धावाच करू शकला. याचबरोबर अटलांटा फायरने 172 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अटलांटाच्या जस्टिन डिलने चार विकेट घेतल्या. त्याने 3.50 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटसह 4 षटकांच्या कोट्यातून केवळ 14 धावा दिल्या.

कॉर्नवॉल (Rahkeem Cornwall) हा जास्त वजनामुळे धावण्यास आळस करतो. पण तो क्रिजवर उभाराहूनच चौकार-षटकार ठोकून धावा वसूल करण्यात पटाईत आहे. त्याची ही क्षमता कोणत्याही गोलंदाजा लाईन लेन्थ खराब करण्यास पुरेशी आहे. त्याने 27 सप्टेंबर रोजी CPL मध्ये क्वालिफायर वन मध्ये बार्बाडोस रॉयल्ससाठी 54 चेंडूत 91 धावा केल्या. यादरम्यान त्याने 11 षटकार आणि 2 चौकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ चौकार आणि षटकार लगावून 74 धावा केल्या होत्या. कॉर्नवॉलने विंडीजसाठी आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 238 धावा केल्या आहेत. अँटिग्वाच्या या क्रिकेटपटूने सुमारे 150 च्या स्ट्राइक रेटने 1146 धावा केल्या आहेत आणि 31 विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला आहे.

Back to top button