Shimron Hetmyer | विमान चुकले अन् हेटमायरचा T20 वर्ल्ड कप टीममधून पत्ता कट | पुढारी

Shimron Hetmyer | विमान चुकले अन् हेटमायरचा T20 वर्ल्ड कप टीममधून पत्ता कट

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याला वेस्ट इंडिजच्या टी२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाला जाणारे निर्धारित विमान चुकवल्यामुळे हेटमायरला संघातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हेटमायरच्या जागी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (West Indies Cricket Board) शमरह ब्रूक्सला संघात स्थान दिले आहे. हेटमायर शनिवारी (१ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाला विमानाने जाणार होता. पण त्याच्या विनंतीनुसार त्याच्या विमान प्रवासाचे वेळापत्रक सोमवारी बदलण्यात आले होते. २५ वर्षीय हेटमायरने क्रिकेट बोर्डाला कळवले की त्याला कौटुंबिक कारणांमुळे विमान पकडून वेळेत पोहोचयाला होणार नाही.

टी२० विश्वचषक स्पर्धेआधी वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला T20I सामना ५ ऑक्टोबर रोजी होत आहे. पण या सामन्यासाठी हेटमायर वेळेत पोहोचू न शकल्याने वेस्ट इंडिज संघातून त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी शमरह ब्रूक्स याला संधी देण्यात आली आहे. ३४ वर्षीय फलंदाज असलेल्या ब्रूक्सने जमैका तल्लावाहला सीपीएल ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने अंतिम सामन्यांत ४७ धावा केल्या. त्याआधी त्याने एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ४७ आणि १०९ धावा कुटल्या होत्या.

“आम्ही हेटमायरच्या (Shimron Hetmyer) कौटुंबिक कारणांमुळे त्याच्या विमान प्रवासाची वेळ शनिवार ऐवजी सोमवार केली होती. त्याला सांगण्यात आले होते की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आणखी विलंब केल्यास त्याच्या जागी संघात दुसऱ्या कोणाला घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी संघाच्या क्षमतेबद्दल आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे संचालक जिमी अॅडम्स यांनी म्हटले आहे.

“हेटमायर अलीकडील काही T20 सामन्यांत वेस्ट इंडिज संघाचा एक भाग होता आणि नुकत्याच संपलेल्या सीपीएलच्या शेवटच्या टप्प्यात त्याने दमदार कामगिरी केली आहे. तो या आठवड्यात शक्य तितक्या लवकर ऑस्ट्रेलियाला रवाना होईल आणि मी त्याला आणि सर्व संघाला खूप खूप शुभेच्छा देतो.” असे त्यांनी नमूद केले आहे.

T20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत वेस्ट इंडिजचा सामना स्कॉटलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्याशी होणार आहे. त्यापूर्वी वेस्ट इंडिज ७ ऑक्टोबर रोजी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक T20I सामना खेळणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button