

फ्लोरिडा; पुढारी ऑनलाईन : चौथ्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies vs India 4th T20I) ५९ धावांनी पराभूत करत भारताने टी २० मालिका खिशात घातली. भारताने ठेवलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १३२ धावांवर गारद झाला. भारताच्या गोलंदाजांनी ठरावीक अंतरावर बळी घेत अखेर वेस्ट इंडिजचा डाव १३२ धावांत गुंडाळला. वेस्ट इंडिजचे फलंदाज चांगल्या धावगतीने धाव घेत राहिले. पण, मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांनी भारताच्या गोलंदाजांना विकेट बहाल केल्या. सुरुवातीला जलदगती गोलंदाजांच्या आणि नंतर फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचे खेळाडू फसले अन् अवघा संघ १३२ धावांत गारद झाला.
वेस्ट इंडिजचे सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली पण, संघाच्या १८ धावसंख्येवर भारताच्या आवेश खानने ब्रॅडन किंग याला १३ धावांवर बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. ब्रॅडन किंगने ८ चेंडूत १३ धावा केल्या. त्यांनतर लगेच आवेश खानने नवा फलंदाज थॉमसला दीपक हुडाकडे झेल देण्यास भाग पाडून बाद केले. थॉमस फक्त १ धाव करुन बाद झाला. अशा प्रकारे भारताने चौथ्या षटकात वेस्ट इंडिजच्या संघास दोन मोठे झटके दिले. त्यानंतर आलेला कर्णधार निकोलस पुरन याने भारतीय गोलंदाजीचा समाचार घेण्याचे ठरवले. त्याने फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला एका षटकात तीन षटकार आणि एक चौकार ठोकला. पण, दुर्दैवाने तो धाव बाद झाला आणि त्याने आपली विकेट गमावली. पुरन याने अवघ्या ८ चेंडूत २४ धावा केल्या.
पुरन बाद झाल्यावर अक्षर पटेल याने काईल मेअर्स याला झेल बाद केले. मेअर्स याने १६ चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. रोमन पॉवेल याने यानंतर काही काळ फटकेबाजी केली. त्याने सुद्धा अक्षरला एका षटकात दोन उत्तुंग षटकार ठोकले. पण मोठे फटके खेळण्याच्या नादात तो अक्षरच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाकडे झेल देऊन बाद झाला. पॉवेलने १६ चेंडूत २४ धावांची खेळी केली. यानंतर अनुभवी जेसन होल्डर याने रवी बिश्नोई याला एका षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. पण, तो देखिल मोठा फटका खेळण्याच्या नादात जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन याच्याकडे झेल देऊन बाद झाला. होल्डर याने ९ चेंडूत १३ धावांची खेळी केली.
यानंतर अकील हुसेन याला रवी बिश्नोई याने सुर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडून बाद केले. हुसेन याने ३ धावा केल्या. यानंतर शेमरॉन हेटमायर याने देखिल काही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. त्यात तो काहीसा यशस्वी ठरला पण, रवी बिश्नोई याचा चेंडूवर तो बोल्ड झाला. हेटमायर याने १९ चेंडूत १९ धावांची खेळी केली. त्यानंतर अर्शदीप याने डॉमेनिक ड्राकेस आणि मकॉयला यांना बाद करत १३२ धावांवर वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला.
भारताच्या गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. सुरुवातीला जलद गती गोलंदाज आवेश खान याने दोन बळी घेत वेस्ट इंडिजला धक्के देण्यास सुरुवात केली. आवेश खान याने ४ षटकात १७ धावा दिल्या. त्यानंतर फिरकी गोलंदाज अक्षर पटेल थोडा महागडा ठरला पण तो महत्त्वपूर्ण दोन बळी घेण्यात यशस्वी झाला. त्याने आपल्या ४ षटकात ४८ धावा दिल्या. दुसरा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने देखिल चांगली गोलंदाजी केली. त्याने देखिल २७ धावा देत २ बळी मिळवले. जलदगती गोलंदाज अर्शदीपने सुद्धा अचूक गोलंदाजी करत ३ बळी मिळवत सामन्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सुरुवातील मोठे झटके देणारा गोलंदाज आवेश खानला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.
तत्पुर्वी, भारताने चौथ्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिज समोर ५ गड्यांच्या मोबदल्यात १८० धावांचे आव्हान उभे केले. मैदानावर दव पडल्यामुळे काहिसा उशिरा सुरु झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील सलामीवीर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यांनी ताबडतोब फटकेबाजी सुरु केली. त्यांनी पहिल्या तीन षटकात भारताचा स्कोर ३९ वर पोहचवला. त्यानंतर पाचव्या षटकात ५३ धावांवर रोहित शर्मा त्रिफळाचित झाला. त्याने फिरकी गोलंदाज अकील हुसेन याला आधी षटकार ठोकला आणि त्या पुढील चेंडूवर बोल्ड झाला. रोहितने तडाखेबाज फटकेबाजी करत अवघ्या १६ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. रोहित पाठोपाठ सुर्यकुमार देखिल सहाव्या षटकात बाद झाला. त्याने १४ चेंडूत २४ धावा केल्या. त्याला अल्झारी जोसेफ याने पायचीत केले. सुर्याने देखिल १ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. दोन्ही सलामीवीर तंबुत परतल्यावर ऋषभ पंत आणि दीपक हुडा हे नवे खेळाडू मैदानात उतरले.
दीपक हुडा आणि ऋषभने भारताचा डाव सावरला. त्याने धावगती स्थिर ठेवत धावांमध्ये भर घालण्याचा पर्यंत केला. या जोडीने मैदानात स्थिर होत भारताला शंभरी पार पोहचले. पण अखेर बाराव्या षटकात भारताची धावसंख्या २ बाद १०८ असताना अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर दीपक हुडाने ब्रॅडम किंगकडे झेल देऊन २१ धावांवर बाद झाला. त्याने २१ चेंडूचा सामना केला. ऋषभ पंतने मैदानात स्थिरावत चौफेर फटकेबाजी केली. तो चांगल्या लयीमध्ये देखिल दिसत होता. त्याने संजू सॅमसनला सोबत घेऊन जबाबदारीने खेळ करत भारताच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. पंधराव्या षटकात ओबेड मकॉय यांच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. ऋषभने ३१ चेंडूत ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळी त्याने ६ चौकार ठोकले. ऋषभ पंत बाद झाल्यावर दिनेश कार्तिक मैदानात उतरला पण त्याला फारसे यश आले नाही. तो अवघ्या ६ धावा करुन तंबुत परतला. १९ व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात तो मकॉयची शिकार ठरला.
संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी शेवटच्या दोन षटकात चांगली फटकेबाजी केली. अक्षर पटेलने दोन मोठे षटकार ठोकले. या दोघांच्या खेळीमुळे भारतला १९१ धावांपर्यंत पोहचता आले. संजू सॅमसन याने २३ चेंडूत ३० धावा करुन नाबाद राहिला. या खेळीत त्याने १ षटकार आणि २ चौकार लगावले. तर अक्षर पटेल याने अवघ्या ८ चेंडूत २० धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याने १ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.
वेस्ट इंडिजकडून ओबेड मकॉय याला दोन बळी मिळवता आल्या पण, त्याला भारतीय फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. त्याने ४ षटकात तब्बल ६६ धावा दिल्या. जोसेफ अल्झारीने चार षटकात ३१ धावा देत दोन गडी बाद करण्यात यशस्वी ठरला. तर जेसन होल्डर आणि डॉमिनीक ड्राकेस यांना बळी मिळविण्यात अपयश आले. तसेच फिरकी गोलंदाज अकील हुसेन याने रोहित रुपात एकमेव मोठी विकेट मिळवली.