

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat-KL Rahul Out : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA T20) टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार नाही. वृत्तानुसार, अगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेऊन त्याला शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. भारताला टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मध्य प्रदेशातील इंदूर येथे खेळायचा आहे, मात्र विराट सोमवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात विराट कोहलीने 49 धावांची नाबाद खेळी केली. 175 च्या स्ट्राईकरेटने खेळताना त्याने सात चौकार आणि एक षटकारही लगावला.
एका अहवालानुसार, टीम इंडिया टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. त्याआधी रोहित ब्रिगेड 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी 20 सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर खेळाडूंना घरी जाऊ दिले जाणार नाही. त्यांना थेट ऑस्ट्रेलियाचे विमान पकडावे लागेल, त्यामुळे विराट कोहलीने आफ्रिकन संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातून विश्रांती घेतल्यानंतर दोन दिवस सुट्टी घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याची ही इच्छा संघ व्यवस्थापनाने मान्य केली आहे. (Virat-KL Rahul Out)
टी 20 वर्ल्ड कपपूर्वी भारत मंगळवारी शेवटचा सामना खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेपासून कोहलीने भारताचे सर्व सामने खेळले आहेत. त्याने 10 डावात 141.75 च्या स्ट्राईक रेटने 404 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. कोहली आता टी 20 वर्ल्ड कपमध्ये 23 ऑक्टोबरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. (Virat-KL Rahul Out)
केएल राहुल सुद्धा बाहेर…
भारतीय क्रिकेट संघाचा दमदार सलामीवीर केएल राहुल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. भारताने पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करून ऐतिहासिक मालिका जिंकली आहे. त्यानंतर आता दोन्ही संघ इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 4 ऑक्टोबरला मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहेत.