Virat Kohli-DK : विराट कोहलीचा दिनेश कार्तिककडून स्ट्राईक घेण्यास नकार, कारण… (Video)

Virat Kohli-DK : विराट कोहलीचा दिनेश कार्तिककडून स्ट्राईक घेण्यास नकार, कारण… (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli-DK : भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी20 सामना 16 धावांनी जिंकून इतिहास रचला आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंदियाने द. आफ्रिकन संघाला भारतीय मैदानावर पराभूत केले. रविवारी (दि. 2) गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावातच सामना एकतर्फी केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 237 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या द. आफ्रिकेच्या संघाला 221 धावाच करता आल्या.

भारतीय डावात सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावली. सूर्याने 61, तर राहुलने 57 धावा केल्या. या डावात आणखी एका भारतीय फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आले असते. मात्र संघ हितासाठी त्याने अर्धशतक पूर्ण करण्याची पर्वा केली नाही. त्या खेळाडूचे नाव आहे विराट कोहली. (Virat Kohli-DK)

गुवाहाटीतील सामन्यात विराटने नाबाद 49 धावांची खेळी केली. विराटने 28 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह हा पराक्रम केला. पण शेवटच्या षटकात त्याने अशीच एक कामगिरी केली. जे पाहूण विराट सारखा महान खेळाडू कधीही स्वत:च्या विक्रमांसाठी खेळत नसतो याची नक्कीच जाणीव होईल.

फिफ्टी पूर्ण करणार का? DK ची विराटला विचारणा..

भारतीय डावाच्या 19व्या षटकात सूर्यकुमार यादव बाद झाला. यानंतर मैदानात विराटच्या साथीला टीम इंडियाचा फिनिशर दिनेश कार्तिक दाखल झाला. 19व्या षटकात डीकेने एकच चेंडू खेळला. विराटने या षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर सलग दोन चौकार मारले. यासह त्याची वैयक्तीक धावसंख्या 49 पर्यंत पोहोचली. विराट आता आपले अर्धशतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच षटकाचा शेवटचा चेंडू डॉट गेला. त्यामुळे पुढच्या षटकात स्टाईक दिनेश कार्तिककडे आले. (Virat Kohli-DK)

20 वे षटकासाठी बामुवाने चेंडू रबाडाकडे सोपवला. या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये डीकेला वाईडसह केवळ पाच धावा घेता आल्या. पण षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार खेचला. आता भारतीय डावाचे केवळ दोनच चेंडू शिल्लक होते. दुसरीकडे विराटला 34 वे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एक धाव काढायची होती. कार्तिकच्या ही बाब लक्षात आली. तो तत्काळ नॉन स्टाईकरला असणा-या विराटकडे गेला आणि 'पुढच्या चेंडूवर मी सिंगल धाव घेऊ का?', असे विचारले. मात्र, विराटने कार्तिकला नकार देत, तसं करू नकोस. तू जाऊन फटकेबाजी कर, असा मोलाचा सल्ला दिला. कार्तिकने पुन्हा पुढच्या (5 व्या) चेंडूवर षटकार ठोकला. त्यामुळे षटकातील शेवटचा चेंडू फक्त दिनेश कार्तिक खेळणार हे निश्चित झाले. अशा स्थितीत डीकेने शेवटच्या चेंडूवर सिंगल घेतल्याने विराटचे अर्धशतक हुकले. कार्तिकच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने शेवटच्या षटकात 18 धावा वसूल केल्या. या डावात विराट भलेही अर्धशतकाला एका धावेने मुकला असला तरी तो नेहमी संघासाठी खेळतो हे त्याने दाखवून दिले आहे.

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम

या सामन्यात नाबाद 49 धावा करण्यासोबतच कोहलीने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने 337 डावात हा विक्रम केला. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनीही या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करत भारताला द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या मालिकेत विजय मिळवून दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news